
एमपीएससी पेपरफुटीत प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये कारवाई
नंदुरबार: राज्यातील एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात प्रेमाचा अँगल असल्याचे सांगण्यात येत होते. त्याच प्रेमप्रकरणातून हा पेपर फुटल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, केवळ प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा हा प्रकार असल्याचे पेपरफुटी प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे यांनी सांगितले. यासंदर्भात तक्रार देणाऱ्या गौरव पाटील यांनाच पोलिसांनी अटक केल्याचेही त्यांनी सांगितले. आता, पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी तक्रारदार प्रवीण पाटील याला अटक केल्यानंतर आपला मोर्चा नंदुरबारकडे वळवला आहे. एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या पथकाने नंदुरबारमधून ताब्यात घेतले आहे.
एमपीएससी अन्न व औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणात प्रेमाचा अँगल समोर आला होता. तक्रारदार गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्या प्रेम प्रकरणातून हा पेपर फुटल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रेमाचा अँगल केवळ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप, तक्रारद्रार ऋषिकेश गांगुर्डे यांनी केला आहे. त्यातच, पोलिसांनी याप्रकरणात गौरव पाटीलला अटक केल्यानंतर आता ऋतुजा पाटीललाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ऋतुजा पाटील यांना त्यांच्या ज्ञानदीप सोसायटीतील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांचे पथक आज सकाळीच नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. या पथकाकडून नंदुरबारातील विविध ठिकाणी झडती आणि चौकशी केल्यानंतर, अखेर ऋतुजा पाटील हिला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या ऋतुजा पाटीलला मुंबईतील विशेष गुन्हे शाखेच्या पथकाकडून मुंबईला नेण्यात येणार असल्याचे समजते. ऋतुजा पाटीलला ताब्यात घेतल्यानंतर औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी चोर सोडून संन्यासाला पकडण्याचा प्रकार केला आहे. जो गौरव पाटील पेपरफुटी प्रकरणात माझ्यासोबत तक्रार द्यायला होता तो कसा काय आरोपी असू शकेल? तो आणि मी तुकाराम मुंढे यांना भेटून तक्रार दिली आणि त्यानंतर एमपीएससी आयोगात येऊन लेंडवे नावाच्या अधिकाऱ्याला भेटलो. तो पेपरफुटीचा मास्टरमाईंड आहे, असा आरोप तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे याने केला आहे. पायल किंवा तिच्या घरातल्या व्यक्तीने पेपर फोडलेला नाही,
नकाते नावाच्या ज्या अधिकाऱ्याला अटक झाली आहे, त्याने आपल्या पुतण्यासाठी तो फोडला आहे. त्यानंतर ज्याने पेपर ५० लाख रुपयांना खरेदी केला त्याने पुढे आपले पैसे रिकव्हर करायला प्रत्येकी १० लाख रुपयांना विकला आणि तिथून पुढे मोठ्या प्रमाणावर तो विकला गेला. या प्रकरणाची व्याप्ती सातारा बीड, सोलापूर जिल्ह्यात मोठी आहे आणि हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत, असा गंभीर आरोपही ऋषिकेश गांगुर्डेनी केला आहे.

