
रिक्षाचालकाचा रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपी फरार…
रत्नागिरीः नर्सिंग महाविद्यालयातील एका १९ वर्षे वयाच्या प्रशिक्षणार्थीवर एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असे रत्नागिरी पोलिसांनी येथे सांगितले. त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी रिक्षाने घरी जात असताना, रिक्षा चालकाने तिला पाणी पिण्यास दिले. पाण्यात गुंगीचे औषध मिसळले असावे. कारण पाणी प्यायल्यानंतर ही तरुणी बेशुद्ध झाली. नंतर चालकाने तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला.
शुद्धीवर आल्यानंतर, पीडितेने तिच्या कुटुंबीयांना संपूर्ण माहिती दिली आणि नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. एफआयआर नोंदवण्यात आला असून, आरोपीला शोधण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या प्रशिक्षणार्थीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात आंदोलने सुरू झाली आहेत. स्थानिक रहिवाशांनी काल रात्री अनेक तास रस्ता अडवून या प्रकरणात तातडीने कारवाईची मागणी केली. कोलकाता येथील आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात ३१ वर्षीय डॉक्टरवर झालेल्या भीषण बलात्कार आणि हत्येनंतर महिलांवर होणाऱ्या बलात्कारासारख्या घटनांच्या विरोधात देशभर संताप व्यक्त होत असतानाच रत्नागिरीत ही घटना घडली आहे.

