
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोरीच्या जाळ्यात…
अलिबाग: तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी एक लाख ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रायगड पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
भस्मे हे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी भस्मे यांनी दीड लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारत असताना भस्मे यांना पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई उपअधीक्षक पोलीस सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ‘ती चूक करणारा हाच स्वीय सचिव?’या कारवाईनंतर जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत यापूर्वी उपस्थित झालेल्या काही चर्चांनाही पुन्हा उजाळा मिळाला आहे. काही काळापूर्वी जिल्हा परिषदेतील माहिती पत्रकारांना देण्याबाबत निर्बंध घालण्यात आल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर पत्रकारांसाठी माहितीची दारे खुली करताना अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी ही बाब आपल्या स्वीय सचिवांकडून झालेली चूक असल्याचे स्पष्ट केल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात होती. त्यामुळे त्या वेळी ‘ही चूक करणारे स्वीय सचिव कोण?’ असा प्रश्न उपस्थित झाला होता.

