
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा; पाहा कोणकोणते रस्ते बंद…
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या मार्गावर दरड कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. महामार्गावरील ८.९ किमी लांबीचा बोगदा संपताच खंडाळा एक्झिटजवळ ही दरड कोसळली. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी लेन पूर्णपणे ठप्प झाली असून, या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मोठा अनर्थ टळला आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून आज (सोमवार) पहाटे 4 वाजल्यापासूनच या मार्गावरील वाहतूक तातडीने इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे. हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून वाहतूक बंद आहे. सध्या घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्ग वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने परिस्थितीवर सातत्याने बारीक लक्ष ठेवले जात आहे. रस्ता पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत प्रवाशांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रचंड गाजावाजा करुन बांधण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक महामार्गाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. काही दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅब कोसळल्याचा प्रकार घडला आहे. स्लॅब कोसळून डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर छतामधून माती आणि पाण्याचा लोंढा रस्त्यावर कोसळत होता. संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रशासनाने नागरिकांना नव्या आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करु नये, असे आवाहन केले आहे. सध्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. गेल्या चार तासांपासून लोणावळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या काही तासांमध्ये लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीच्या कितीतरी पट अधिक पाऊस झाला आहे.
पाहा कोणकोणते रस्ते बंद…
मुंबई – पुणे एक्स्प्रेसवे बंद
मुंबई – पुणे जुना हायवे बंद
मुंबई – गोवा हायवे चिपळूण खवटीजवळ बंद
रायगडमध्ये पेण-खोपोली मार्ग बंद
रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग सुकेळी खिंडीत बंद
रायगड – माणगाव-पाली मार्ग बंद
रायगड – माणगाव-पुणे ताम्हणी घाटमार्ग बंद
रायगड वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली, वरंध घाटातील वाहतूक बंद, पुणे आणि रायगड जिल्ह्याचा संपर्क तुटला
View this post on Instagram
मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरीज मिसिंग लिंक या ठिकाणी दरड कोसळली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी सर्व वाहने उर्से टोलनाक्याजवळ अडवली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेंनवर जवळपास ४ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत.
श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल…

