भाजप नेत्याची पोलिसांना धमकी, व्हिडिओ व्हायरल…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरवू,’ असे म्हणत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस माझं काही वाकडं करू शकत नाही, असे वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केले होते. यानंतर आता आणखी एका भाजप नेत्याचा असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात शिवजयंती निमित्त दुचाकी रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. दरम्यान, याचवेळी या मार्गावरून दुचाकी रॅली निघाली होती. यातील काहीजण चुकीच्या दिशेने जात असल्याने पोलिसांना त्यांना अडवून परत जाण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तिथे भाजपचे माजी नगरसेवक अनिल मकरीये पोहचले. त्यांनी थेट पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना दम भरला. तसेच ‘राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरवू’ अशी थेट धमकीच दिली. शेवटी वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी प्रकरण मिटवले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून, ज्यात माजी नगरसेवक मकरीये पोलिसांना दम देतांना पाहायला मिळत आहे.

अनिल मकरीये हे एका मंत्र्याच्या जवळचे नेते असल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई झाली नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, पोलिस दलात दबक्या आवाजात या किरकोळ कारवाईमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून सतत पोलिसांबद्दल अशी अपमानास्पद वक्तव्य केली जात आहे. ‘पोलिस माझं काही वाकडं करू शकत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला असल्याचे’ वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले होते. त्यानंतर ‘माझ्या कुठल्याही वक्तव्यावर पोलिस माझं काही बिघडवू शकत नाही. ते व्हिडिओ काढतायेत, पण घरी जाऊन फक्त बायकोला दाखवतील, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. आता भाजपचा माजी नगरसेवक पोलिसांना ‘राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरवू,’ असे म्हणत दम देत आहे. त्यामुळे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप पक्षातील नेत्यांना झालं तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पोलिस कोठडी…

पोलिसकाकावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळे यांना भोवलं…

भाजपचा नगरसेवक बारमध्येच अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!