हृदयद्रावक! गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…
औरंगाबाद: बहिणींसोबत खेळत असताना गॅसवरील गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पडेगाव परिसरात घडली आहे. शिद्रा हारून शेख (2 वर्षे) असे चिमुकलीचं नाव आहे. वडिलांच्या आंघोळीसाठी आईने गरम पाणी ठेवल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडीलांना अंघोळीसाठी गरम करुन ठेवलेले पाणी दोन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर सांडल्याने गंभीर भाजलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सात जुलै रोजी घडली होती. तेव्हापासून चिमुकलीवर घाटीत उपचार सुरु होते. उपचारादरम्यान चिमुकलीचा मंगळवारी (ता. 11 जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची नोंद छावणी पोलिसांत करण्यात आली आहे.
हारुण शेख यांच्या अंघोळीसाठी पत्नीने पाणी गरम करुन ठेवले होते. गॅसजवळ हारुण यांच्या तीन मुली खेळत होत्या. त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाच्या मुलीच्या अंगावर खेळता खेळता गरम पाणी सांडले. दरम्यान मुलीचे ओरडण्याचा आवाज आल्याने आईने तत्काळ धाव घेतली. यात शिद्रा गंभीर भाजली होती. तिच्यावर घाटीत उपचार सुरु असताना 11 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 90227 97223 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.