प्रेयसीच्या शीतपेयात टाकल्या डांबर गोळ्या आणि संपवले…

मुंबईः प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, सुमारे दोन ते अडीच महिन्यांची गरोदर असलेल्या प्रेयसीची हत्या तिच्याच प्रियकराने केली आहे. तिची हत्या करण्यासाठी त्याने शीतपेयात डांबराच्या गोळ्या टाकल्या होत्या. या घटनेमुळे चेंबूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी प्रियकराला आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स) ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, की २५ ऑगस्ट रोजी ही तरुणी तिच्या प्रियकरासोबत असताना, तिच्यात आणि प्रियकर आशिष मगर यांच्यात वाद झाला. वाद थोडा शांत झाला असला, तरी आशिषच्या डोक्यात संतापाने घर केले होते. म्हणून त्याने तिला शीतपेय प्यायला दिले. या शीतपेयात त्याने आधीच डांबराच्या गोळ्या मिसळल्याचे तिला माहित नव्हते. तिने सहजपणे शीतपेय घेतले आणि तिला अचानक उलट्या होऊ लागल्या. सुरवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केले. त्रास वाढल्यानंतर ती चक्कर येऊन पडली, तेव्हा घरच्यांना अन्नातून विषबाधा झाली असावी, असा संशय आला. त्यानंतर त्यांनी तिला आधी खासगी आणि नंतर शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच तिला डॉक्टरांनी मयत घोषित केले.

दरम्यान, आशिषने आपल्याला शीतपेय दिल्याचे आणि त्यांनंतरच आपल्याला त्रास सुरू झाल्याचे तिने सांगितल्यानंतर, ही घटना तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितली. सुरवातीला आशिषने पोलिसांची दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. तर डॉक्टरांनीही विषबाधेमुळे तिचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तवला आहे. आशिषला प्रेयसीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रेमाचा असा पद्धतीने दुर्दैवी शेवट झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!