बँक ऑफ बडोदावर फसवणुकीचा आरोप करून ठोकला १.४४ लाख कोटी रुपयांचा दावा…

नवी दिल्लीः बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये बुधवारच्या व्यवहारात ३ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे निफ्टी १०० मध्ये हा सर्वाधिक तोटा सहन करणारा शेअर ठरला. ‘एनएमसी हेल्थकेअर’चे संस्थापक बी. आर. शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात, सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदासह इतर २५ जणांविरुद्ध सुमारे १.४४ लाख कोटी रुपयांच्या (१५ अब्ज डॉलर्स) नुकसान भरपाईचा दावा दाखल केल्यानंतर ही घसरण झाली. आपल्याला अद्याप या दाव्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, परंतु ते या आरोपांना उत्तर देतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

सकाळी सुमारे १०.१५ वाजता, बँकेचे शेअर्स २.५ टक्क्यांनी घसरून २३१.६५ रुपयांवर आले. गेल्या सहा महिन्यांत या स्टॉकमध्ये १७ टक्क्यांची घसरण झाली आहे.

‘एनएमसी हेल्थकेअर’ आणि ‘यूएई एक्सचेंज’चे संस्थापक शेट्टी यांनी बँक ऑफ बडोदा आणि इतर २५ जणांकडून सुमारे १.४४ लाख कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करणारा खटला दाखल केला आहे. त्यांचा आरोप आहे की, बँकेने आणि तिच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या समूहाच्या कंपन्यांशी संबंधित फसवणुकीच्या व्यवहारांना मदत केली.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, याचिकेत शेट्टी यांनी प्रत्यक्ष नुकसान, परिणामी नुकसान (जसे की व्यवसायाच्या संधी गमावणे) आणि प्रतिष्ठेचे नुकसान या प्रत्येकासाठी ५ अब्ज डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यांनी मागितलेल्या नुकसान भरपाईवर १८ टक्के वार्षिक व्याजाचीही मागणी केली आहे.

याचिकेद्वारे करण्यात आलेल्या आरोपात म्हटले आहे, की बँक ऑफ बडोदाने पुरवठादारांशी संबंधित खात्यांमार्फत निधी वळवण्यास मदत केली, मनी लाँडरिंग विरोधी सूचनांची योग्य तपासणी केली नाही आणि अनधिकृत व्यवहारांना परवानगी दिली. कर्ज मिळवण्यासाठी आणि त्यांच्यावर दायित्व निश्चित करण्यासाठी बनावट सह्या असलेल्या वैयक्तिक हमीपत्रांचा वापर करण्यात आला

त्यांनी बँकिंग नोंदी आणि अंतर्गत अनुपालन दस्तऐवज सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. हे आरोप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. बँक ऑफ बडोदाने हे आरोप फेटाळले असून २,८०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे म्हटले आहे.

बँक ऑफ बडोदाच्या म्हणण्यानुसार, शेट्टी यांनी न्यूयॉर्कमध्ये अशाच आरोपांसह दाखल केलेला खटला जुलै २०२४ मध्ये फेटाळण्यात आला होता. अबू धाबी ग्लोबल मार्केट कोर्टात शेट्टी आणि ‘एनएमसी’चे माजी कार्यकारी प्रशांत मंगत यांच्याविरुद्ध फसवणूक, निधीचा गैरवापर आणि दिशाभूल करणाऱ्या व्यापाराच्या आरोपांखालील कार्यवाहीतही निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

नवीन खटल्यात मागितलेले १५ अब्ज डॉलर्स ही नुकसान भरपाई आहे, बँकेवर निश्चित केलेले दायित्व नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!