
कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, नाव उघड…
दुबई: दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांचे जगभरातून कौतुक होत आहे. फ्लायदुबईच्या 1073 क्रमांकाच्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे.
सह-वैमानिकाने कॅप्टनवर चाकूने वार केले आणि विमान जमिनीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल अतिरेकी विचारसरणी बाळगत असल्याचा संशय होता. त्यामुळेच ओमानने त्याला यापूर्वी विमान उडवण्यास बंदी घातली होती. या सह-वैमानिकाची ओळख ‘हमाम अल-हम्मामी’ अशी पटली असून, घटनेनंतर तीन दिवसांनी त्याचे नाव उघड झाले. विशेष म्हणजे बंदी असूनही फ्लायदुबईने या सह-वैमानिकाला कामावर घेतले आणि त्याने संयुक्त अरब अमिराती व इस्रायल यांना जोडणाऱ्या संवेदनशील मार्गावर विमान उडवण्यास सुरुवात केली. तसेच हमामीच्या अटकेनंतर त्याच्या बॅगेत विविध वस्तू सापडल्या. त्यामध्ये ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे लिहिलेली पत्रकेही आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, दुबईहून 30 सप्टेंबर 2026 रोजी तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात हवेतच अत्यंत धक्कादायक घटना घडली. बोईंग 737 MAX 8 विमानाने दुबईहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते सुमारे 34 हजार फूट उंचीवरून सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीतून जात होते. विमानात 174 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. उड्डाण सुरळीत सुरू असतानाच कॉकपिटमध्ये कॅप्टन आणि सहवैमानिकामध्ये झटापट झाली. इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओमानी सहवैमानिकाने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर विमान अचानक वेगाने खाली येऊ लागले. विमानाची उंची अवघ्या 30 सेकंदांत 16 हजार फुटांहून अधिक कमी झाली. विमानाच्या वेगातही मोठी चढ-उतार झाली. सर्वात तीव्र अवस्थेत विमान सुमारे 544 फूट प्रति सेकंद या वेगाने खाली जात होते. या परिस्थितीमुळे विमानातील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. काही वेळाने विमानाकडून आपत्कालीन स्थिती दर्शवणारा 7700 आणि त्यानंतर अनधिकृत हस्तक्षेप दर्शवणारा 7500 स्क्वॉक कोड प्रसारित करण्यात आला.
दरम्यान, जखमी कॅप्टन स्मित मच्छार यांनी अत्यंत गंभीर परिस्थितीतही कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यावेळी काही प्रवासी आणि क्रू सदस्य कॉकपिटमध्ये धावले आणि त्यांनी सहवैमानिकाला बाजूला केले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काही प्रवाशांनी सहवैमानिकाला पकडून बांधून ठेवलं. एका प्रवाशाने विमानावरील नियंत्रण स्थिर करण्यास मदत केली, तर विमानातच उपस्थित असलेल्या फ्लायदुबईच्या दोन अतिरिक्त वैमानिकांनी नंतर कॉकपिटचा ताबा घेतला. त्यानंतर विमानाला सौदी अरेबियातील तबूक विमानतळाकडे वळवण्यात आले. सुमारे एका तासाहून अधिक काळाच्या या आपत्कालीन परिस्थितीनंतर FZ1073 विमानाने तबूक विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. कॅप्टन आणि सहवैमानिक दोघांनाही दुखापत झाली होती आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांनाही वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने तेल अवीवला पोहोचवण्यात आले.
संबंधित सह वैमानिकाची पूर्व तपासणी सुरू आहे. UAEच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू असून सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनीही प्राथमिक तपास केला आहे. त्यामुळे FZ1073 प्रकरणातील हल्ल्याचा नेमका हेतू आणि घटनाक्रम अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
फ्लायदुबईच्य़ा सहवैमानिकाची सौदी अरेबियामधून युएईमध्ये बदली; इराणशी संबंध असल्याचा ट्रम्प यांचा दावा…
हात व मान जवळजवळ धडापासून वेगळे; इस्रायली दंतवैद्याने स्मित मछार यांचा वाचवला जीव…
भारतीय वैमानिक जखमी होऊनही भिडला, 174 प्रवाशांचा वाचवला जीव…

