शिंपी असल्याची बतावणी करणाऱ्या खुन्याला अखेर २४ वर्षांनंतर गुरुग्राममध्ये अटक…

नवी दिल्ली: तब्बल २४ वर्षांपूर्वी एका अंध व्यक्तीचा खून करून फरारी झालेल्या फिरोझ ऊर्फ ख्वाजा याला पोलिसांनी गुरुग्राममध्ये अटक केली आहे. २४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीने शिंपी असल्याची बतावणी करत, गुरुग्राममध्ये आपले बस्तान बसविले होते. आयएमटी मानेसर येथील एका तयार कपड्यांच्या कारखान्यात शिंपी म्हणून काम करत होता. जुन्या वैमनस्यातून आणि सूडापोटी त्याने हा खून केला होता.

या अटकेसंदर्भात डीसीपी हर्ष इंदोरा म्हणाले, की आरोपी फिरोज हा बिहारमधील पश्चिम चंपारणचा रहिवासी आहे. १८ फेब्रुवारी २००२ रोजी तुघलकाबाद किल्ल्याजवळील डीडीएच्या जंगलातून एका ३५ वर्षीय पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला होता.

ओखला औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात रीतसर एफआयआर दाखल करण्यात आला होता. मृताची ओळख कलाम अन्सारी (मूळ रा. पश्चिम चंपारण, बिहार) अशी पटली होती. तो २००१ मध्ये फिरोजसोबत रोजगाराच्या शोधात दिल्लीला आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून काही काळाने त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. फिरोजचा भाऊ साहिबजान याचे लग्न कलामच्या गावात झाले होते. साहिबजानच्या पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला होता. या वादामुळे साहिबजानने कलाम अन्सारीच्या घरासमोर आत्महत्या केली होती.

आपल्या भावाच्या मृत्यूला कलाम अन्सारीचे कुटुंब जबाबदार असल्याचा फिरोझला संशय होता. याचा बदला घेण्यासाठी फिरोजने कलामला संपवण्याचा निश्चय केला होता. १५ फेब्रुवारी २००२ रोजी, फिरोजने कलाम अन्सारी यांना तुघलकाबादच्या जंगलात फसवून नेले, जिथे त्याने दगडांनी डोके ठेचून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर आरोपी बिहारला परत पळून गेला आणि त्याने कलाम यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ठिकाणाबद्दल खोटी माहिती दिली.

न्यायालयात पोलिसांनी खटला दाखल केला. निकालात फिरोझ दोषी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर तो कायमचा फरार झाला. बराच काळ तो न सापडल्याने, हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

त्यानंतर, एसीपी सत्येंद्र मोहन आणि इन्स्पेक्टर विनय कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने दोन महिन्यांत बिहारमधील सुमारे ३० ठिकाणी छापे टाकले. जुन्या नोंदींची छाननी, तांत्रिक तपासणी आणि प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीची लपण्याची ठिकाणे शोधून काढली. अखेरीस, विश्वसनीय माहितीच्या आधारे त्याला अखेर गुरुग्राममध्ये अटक करण्यात आली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!