
ग्रेटर नोएडामध्ये जीएनआयओटी महाविद्यालयाजवळ वेगवान गाडीखाली चिरडले गेले पाच विद्यार्थी…
ग्रेटर नोएडा: नॉलेज पार्क कोतवाली परिसरातील जीएनआयओटी महाविद्यालयाजवळ, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच विद्यार्थ्यांना भरधाव गाडीने धडक दिली. घटनेचा व्हीडिओ इंटरनेटवर वेगाने पसरतो आहे. व्हीडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला अटक केली आणि गाडी जप्त केली आहे.
व्हीडिओमध्ये अनेक विद्यार्थी आणि इतर लोक रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसत आहेत. त्यानंतर एक भरधाव वेगाने येणारी गाडी गर्दीत घुसते आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना धडक देते. या घटनेनंतर, गाडीतील तरुण गाडी घेऊन घटनास्थळावरून पळून गेला.
पोलिसांच्या माहितीनुसार, गाडीची धडक बसलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्रभारी निरीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की, व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून, गाडी जप्त करण्यात आली आहे. तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

