पुण्यात ४ ट्रक पनीर-खवा जप्त; तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनाचा सर्वांत मोठा दणका!

पुणेः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून ४ ट्रक पनीर-खवा जप्त करण्यात आले आहे. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे मिठाई आणि त्यांच्या पुरवठादारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

एफडीएच्या पथकाने पुण्यातील बुधवार पेठेत धडक कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील हा साठा पाहता, कारवाईसाठी अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांची गुणवत्ता आणि साठ्याच्या स्रोताबाबत तपास सुरू आहे. गणेशोत्सवात मिठाई आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे पुण्यातील खाद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुण्याबरोबरच नाशिकमध्येही एफडीएतर्फे मोठी कारवाई करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्सपोर्टवर छापा घालण्यात आला. अन्न पदार्थ भेसळयुक्त तसेच कमी दर्जाचे असल्याच्या संशयातून ही तपासणी करण्यात आली. त्यात फ्रोझन कस्टर्ड ॲपल पल्प, मँगो पल्प, क्रीमरचा एकूण ६४५७ किलो साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त साठ्याची किंमत तब्बल ३९ लाख १८ हजार ५२० रुपये इतकी आहे. पदार्थांच्या लेबलवर पाकिटबंद केल्याची तारीख आणि एफएसएसएआयचा परवाना क्रमांक आढळला नाही. त्यामुळे अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात भंडारा महाप्रसाद वाटप करण्याच्या नियोजनाबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या काळात कार्यक्रमापूर्वी किमान ७ दिवस आधी सामूहिक अन्नवाटप पूर्वपरवानगी घेण्यात यावी, अशी सूचना एफडीएकडून देण्यात आली आहे. सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच यात्रा, उरूस आदी प्रसंगी आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर, भंडारा व इतर सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांमध्ये अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र सरकारमार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर किंवा स्वयंपाकगृहामार्फत अशा कार्यक्रमांसाठी अन्न तयार व वितरित करण्यात येत असल्यास कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस आधी पदनिर्देशित अधिकाऱ्यास विहित पूर्वसूचना नमुना सादर करणे आवश्यक राहील. अन्न व्यवसाय चालकांनी कार्यक्रमादरम्यान स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य तापमान नियंत्रण, कच्चे व शिजविलेले अन्न यांचे विभाजन, अन्न हाताळणाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अन्न साठवणूक यांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!