
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खारेगावमध्ये अपघातात महिला मृत्यूमुखी; दोन पादचारी गंभीर जखमी…
ठाणे: कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारेगाव येथे एका भरधाव कारने अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शुभांगी पाटील असे मृत महिलेचे नाव असून, त्या खारेगाव येथील स्थानिक रहिवासी होत्या. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
खारेगाव येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना एका चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कारने परिसरातील अनेक वाहनांना एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जवळून जाणारे पादचारी आणि नागरिक या अपघाताच्या कचाट्यात सापडले.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या अन्य दोन व्यक्तींना नागरिकांच्या मदतीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारचा अतिवेग, वाहनातील तांत्रिक बिघाड की चालकाचा निष्काळजीपणा, यांपैकी कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला याचा अधिक तपास सुरू आहे.

