
मुंबईत व्यापाऱ्यावर बोगस छापा; १ कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांच्या छाप्यात ६ जणांना बेड्या…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्पेशल २६’ सिनेमात बोगस प्राप्तिकर अधिकारी दाखवून लूट करण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले होते. तथापि, याच धर्तीवर बनावट प्राप्तीकर अधिकारी बनून अंधेरीत छापा घालण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी तोतया अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अंधेरी परिसरातील या व्यावसायिकाच्या कार्यालयात प्राप्तिकर आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून एका टोळीने छापा घातला. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी व्यावसायिकाकडे १ कोटी रुपयांची मागणी केली. अंधेरी पोलिसांनी सहा खंडणीखोरांना अटक केली आहे.
या टोळीने व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून खरोखरीचे अधिकारी आहोत, याचा पुरावा म्हणून त्यांचे आयकार्ड दाखवले होते. आरोपींपैकी काही जणांनी त्याचवेळी फिर्यादी व त्यांच्या पत्नीचे अपहरण करून यांच्या कार्यालयातील १० कर्मचाऱ्यांचे मोबाईलही काढून घेतले. कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर जाण्यापासून आरोपींनी अटकाव केला, तसेच शिवीगाळ केली आणि गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. त्यासोबत खंडणीची मागणी केली होती.
दरम्यान, या घटनेसंदर्भात फिर्यादीने अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, छाप्यासंदर्भात सविस्तर तक्रार केली. अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सर्व आरोपींना अटक केली आहे. संतोष उदय खोपटकर (वय ३७), विनय रमेश मोरे (वय ३७), प्रेम किसन सबनानी (वय ५०), प्रज्ञा हरीश माईन (वय २७), रेश्मा शामराव वारंग (वय ४१), सबीना हफीज शेख (वय ४८) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी मुंबईत याच पद्धतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा पोलिस तपास करत आहेत.

