हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू…

मुंबई: ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेचा वापर भारतात हेरगिरीसाठी भावी ‘एजंट’ बनवण्यासाठी पाकिस्तानातील ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) या गुप्तचर यंत्रणेच्या हालचाली चालू असल्याचे भयानक कटकारस्थान उघडकीस आले आहे.

सैन्यात दाखल होण्यापूर्वीच भावी हेरगिरीसाठी लागणारे ‘गुणवान’ उमेदवार शोधण्याचे व्यासपीठ म्हणून, अग्निवीर भरती प्रक्रियेवर पाकने लक्ष केंद्रित केल्याचे भारतीय तपास अधिकाऱ्यांना आढळले आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि दिल्ली येथील ‘अग्निवीर’ उमेदवारांना प्रशिक्षण देणाऱ्या खासगी संस्था आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेची तपास यंत्रणांकडून छाननी केली जात आहे. या संस्था आणि प्रशिक्षक कथित आर्थिक लाभाच्या बदल्यात, पाकिस्तानस्थित गुप्तचरांच्या हस्तकांसाठी काम करणाऱ्या मध्यस्थांना उमेदवारांपर्यंत पोचण्याची संधी दिली. तसेच काही प्रकरणांमध्ये उमेदवारांची पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, आवडीनिवडी आणि वैयक्तिक कमकुवत दुवे आदी माहिती त्या मध्यस्थांना पुरवल्याचे दिसून आले आहे.

तपास यंत्रणांकडे आलेल्या गुप्त माहितीनुसार, ही संशयास्पद मोहीम भरतीपूर्व टण्यावरच सुरू झाल्याचे दिसते. यात पाकिस्तान-स्थित सूत्रधार आणि त्यांच्या स्थानिक हस्तकांनी खासगी प्रशिक्षण संस्था व प्रशिक्षकांच्या मदतीने संभाव्य उमेदवारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून संरक्षण दलात दाखल होण्यापूर्वीच त्यांच्याशी संपर्क साधता येईल. लष्करी सेवेत अधिकृतपणे दाखल झाल्यानंतर जवानांना हेरगिरीसाठी प्रवृत्त करणे किंवा फितवणे यात जोखीम असते; त्याऐवजी निवडलेल्या उमेदवारांना दीर्घकाळापर्यंत हाताळून तयार करणे, ही यामागची कथित रणनीती होती.

काही प्रकरणांमध्ये, या हस्तकांनी बनावट ‘सोशल मीडिया प्रोफाइल्स’ तयार केली होती; त्यात ‘अग्निवीर’ उमेदवारांमध्ये रोमँटिक किंवा लैंगिक स्वारस्य दाखवणाऱ्या तरुणींची बनावट प्रोफाइल्सही समाविष्ट होती. त्यानंतर, हे हेर संबंधित उमेदवारांचा विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत. त्यांचे प्रशिक्षण, लष्करी वातावरण आणि नेमणुकीच्या ठिकाणांची माहिती मिळवत असत. अशा प्रकारे निर्माण झालेली माहिती आणि भावनिक बंधांचा वापर करून संबंधित उमेदवारांवर प्रभाव पाडला जात असे आणि अखेरीस त्यांना हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले जात असे. संबंधित यंत्रणांच्या मते, या हेरगिरीच्या कारवायांमध्ये कोचिंग संस्थांची भूमिका महत्त्वाची असते.

तपासकर्त्यांचा असा संशय आहे की, काही उमेदवारांनी सुरुवातीला गुप्त माहिती गोळा करण्यामागचा मूळ उद्देश न ओळखताच अशी माहिती दिली असावी. मात्र, जेव्हा त्या उमेदवारांना यामागील हेतू समजेपर्यंत हे संबंध अशा टप्प्यावर पोचतात, की त्यातून बाहेर पडणे किंवा माहिती देणे थांबवणे जवळजवळ अशक्य होऊन बसते. याचे कारण ब्लॅकमेलिंग, उघडकीस येण्याची भीती किंवा इतर प्रकारचा दबाव हे असू शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!