
वाशीत तरुणाची धारदार हत्याराने निर्घृण हत्या…
नवी मुंबई: वाशी येथील मिनी सी-शोअर परिसरात एका तरुणाची धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना, शनिवारी पहाटे उघडकीस आली. सुजलकुमार फेकू महातो (वय १८), असे मृत तरुणाचे नाव आहे.
सुजलकुमार हा कोपरखैरणे सेक्टर-१९ येथे कुटुंबासह राहत होता. तो चायनीज खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर काम करीत होता. अधूनमधून वडिलांची ऑटोरिक्षाही चालवत होता. शुक्रवारी रात्री तो वडिलांची ऑटोरिक्षा घेऊन घराबाहेर पडला; मात्र कुठे जात असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले नव्हते.
शनिवारी पहाटे सुमारे चार वाजता मिनी सी-शोअर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला फुटपाथवर सुजलकुमार मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर, हातांवर तसेच शरीराच्या अन्य भागांवर धारदार हत्याराने वार केल्याचे प्राथमिक तपासात आढळले. वाशी पोलिसांसह गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून पुरावे संकलित केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरू असून, ऑटोरिक्षाचाही शोध घेतला जात आहे.

