
नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटरची ठाण्यात चोरी; झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक चोऱ्या…
ठाणे: शहरातील पाणीचोरी आणि पाण्याची गळती रोखण्याबरोबरच नागरिकांकडून पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या स्मार्ट मीटर योजनेलाच आता चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. २०१९ पासून शहरात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत तब्बल पाच हजार स्मार्ट मीटर चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने झोपडपट्टी परिसरात मीटर चोरीचे प्रमाण अधिक असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सुमारे १ लाख १३ हजार ३२८ नळजोडण्या आहेत. यापैकी आतापर्यंत १ लाख ६ हजारांहून अधिक नळजोडण्यांवर स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. शहरातील पाण्याचा वापर नेमका किती होतो, त्यानुसार पाणीबिल आकारणे, पाणीगळती शोधणे तसेच अनधिकृत पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, स्मार्ट मीटरच चोरीला जाऊ लागल्याने या योजनेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या नऊही प्रभाग समिती हद्दीत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात आले. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मीटर बसविण्यात आले असले तरी त्यापैकी सुमारे पाच हजार मीटर चोरीला गेल्याची नोंद पाणीपुरवठा विभागाकडे आहे. मुंब्रा, दिवा, मोघरपाडा, वाघबिळ यांसह काही झोपडपट्टी भागांमध्ये ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे.
मीटर चोरीला गेल्यानंतर ग्राहकांना पुन्हा मीटर बसवण्याची प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे लोकांची गैरसोय होण्याबरोबरच पालिका व संबंधित संस्थेवरही अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
स्मार्ट मीटर चोरीची पद्धतही सहज असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मीटरला जोडलेला पीव्हीसी पाइप कापून काही क्षणांत मीटर काढून नेला जात असल्याचे समोर आले आहे. या मीटरमध्ये पितळेचा भाग असल्याने चोरट्यांना तो भंगारात विकून पैसे मिळतात. एका मीटरमधील पितळ विकून साधारण ४०० ते ५०० रुपये मिळत असल्याने, या किरकोळ आर्थिक फायद्यासाठी चोरटे स्मार्ट मीटरवर डल्ला मारत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
पाणीचोरी आणि गळती रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणारी स्मार्ट मीटर यंत्रणा आता चोरट्यांच्या रडारवर आली आहे. पाणीवापराचा हिशेब ठेवणाऱ्या मीटरचा हिशेबच चोरट्यांनी बिघडविला आहे. पाच हजार मीटर चोरीला जाणे ही किरकोळ बाब नसून भविष्यातील स्मार्ट मीटर योजनेसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे मीटर चोरी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्मार्ट मीटर चोरीला गेल्याचे लक्षात येताच संबंधित ग्राहकांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. चोरीची माहिती महापालिकेलाही देणे आवश्यक आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी नळजोडणी परिसरात बसवलेल्या मीटरकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याचे काम महापालिकेने खासगी संस्थेला दिले आहे. एका स्मार्ट मीटरच्या बसवणुकीसाठी साधारण ६ हजार ६०० रुपये खर्च येतो. मीटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारीही संबंधित संस्थेची आहे. मात्र, हजारो मीटर चोरीला गेल्याने केवळ नागरिकांचीच गैरसोय होत नाही, तर या यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीबरोबरच चोरी झालेल्या मीटरच्या पुनर्बसवणुकीचे आव्हानही प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
स्मार्ट मीटरमुळे पाण्याच्या वापराची अचूक नोंद होत असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. मात्र, दुसरीकडे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अधिक पाणीबिल येत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे मीटरची अचूकता, बिलाची पद्धत आणि प्रत्यक्ष पाणीवापर याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. एकीकडे मीटर चोरीचे वाढते प्रकार, तर दुसरीकडे वाढीव बिलाच्या तक्रारी यामुळे स्मार्ट मीटर योजना नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पालिका हद्दीत सुमारे अडीच लाख ग्राहक असल्याची माहिती आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने नळजोडण्यांवर स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. भविष्यात उर्वरित नळजोडण्यांनाही स्मार्ट मीटरच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मीटर चोरीचे प्रकार रोखले नाही तर भविष्यात समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

