हैदराबादजवळ बस ट्रकला धडकल्याने ६ ठार १२ गंभीर जखमी

हैदराबादः तेलंगण राज्य परिवहनाची एक इलेक्ट्रिक बस हैदराबादहून विजयवाडामार्गे एलुरुकडे जात असताना, आज (बुधवारी) पहाटे सूर्यपेटजवळील कोडड येथे एका कंटेनर ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात, सहा प्रवासी मृत्यूमुखी पडले, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या घटनेची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले, की बसमध्ये चालक आणि सहचालक वगळता एकूण ४२ प्रवासी होते. ज्या ट्रकला ही बस धडकली, तो देखिल एकाच दिशेने जात होता. ट्रकमध्ये अॅल्युमिनियमचे विजेचे खांब होते. भरधाव वेगात दुसऱ्या वाहनाला ओलांडण्याच्या प्रयत्नात, बस या ट्रकला मागच्या बाजूने धडकली. धडक इतकी जोरदार होती, की ट्रकमधील विजेचे खांब थेट बसमध्ये घुसले. त्यामुळे बसचा दर्शनी भाग पूर्णपणे चिरडला गेला.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आणि गंभीर जखमी प्रवाशांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्यात येतील, असे आश्वासन दिले. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचेही त्यांनी जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!