
HSRP नंबरप्लेट नसणाऱ्यांवर होणार कारवाई; पाहा किती दंड भरावा लागेल…
पुणे: उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ देऊनही अल्प प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन विभागाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. १५ फेब्रुवारीपासून उच्च सुरक्षा नंबरप्लेट न लावलेल्या वाहनांवर कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार होती. त्यापैकी आतापर्यंत दहा लाख ७० हजार वाहनचालकांनी नंबरप्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे. आठ लाख ६२ हजार वाहनांना नंबरप्लेट बसविण्यात आली आहे. पुण्यात अद्यापही १५ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. पण, वाहन चालकांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही.

परिवहन विभागाने आतापर्यंत नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० एप्रिल, ३० जून आणि १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर अशी मुदतवाढ दिली होती. पण, या काळात अनेक वाहनचालकांनी नंबरप्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे. ३१ डिसेंबरला मुदत संपल्यानंतरदेखील परिवहन विभागाने कारवाई सुरू केली नाही. वाहनचालकांना काही कालावधी मिळावा म्हणून थांबले; पण वाहनचालक गंभीर नसल्याचे दिसून आल्यामुळे आता कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, मुदतीपूर्वी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना मर्यादित अतिरिक्त वेळ देण्यात आला असला, तरी मुदतीनंतर अपॉइंटमेंट घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहनांच्या तपासणीदरम्यान वाहनांची सुरक्षा नंबर प्लेट, विमा, पीयूसी आणि वाहनचालक परवाना यांचीही पडताळणी केली जाणार आहे. साधारण १५ फेब्रुवारीनंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. कोणत्याही वाहनधारकाला आता आणखी वेळ मिळणार नाही.
वाहनांची सुरक्षितता वाढावी, वाहनांचा गैरकृत्यांसाठी वापर टाळता यावा, वाहन क्रमांकाच्या आधारे वाहनचालकांचा माग काढणे अधिक सुलभ व्हावे आदी हेतूंनी सरकारने उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात ‘एचएसआरपी ’ बसवणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी गेल्या वर्षाीपासून मोहीमही राबविण्यात येत आहे. प्लेट बसविण्याची केंद्रेही वाढवली आहेत. नंबरप्लेट बसवलेली नसल्यात वाहनचालकांना १००० रुपयांपासून ते १०००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
२५ लाख- पुण्यातील वाहनांची सुमारे संख्या
१०.७० लाख- ‘एचएसआरपी’ साठी नोंदणी केलेली वाहने
८.६२ लाख- नवीन नंबरप्लेट बसवलेली वाहने
HSRP Number Plate नसेल तर किती भरावा लागेल दंड…
राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…
वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना मोजावी लागणार मोठी किंमत…
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर 3000 रुपयांचा Fastag चालणार का? घ्या जाणून…

