
धक्कादायक! माती उकरली अन् बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक नानासाहेब रामजी दिवेकर (वय ४८) यांची निघृण हत्या करून त्यांचा मृतदेह त्यांच्याच घराशेजारील पडीक जागेत पुरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात आणि जिल्ह्यात मोठी खळबळजनक उडाली आहे.
नानासाहेब दिवेकर हे मूळचे बळ्हेगावचे रहिवासी असून ते पडेगाव येथून ड्युटीवर ये-जा करत असत. १ जानेवारीपर्यंत ते कर्तव्यावर होते, त्यानंतर वडिलांना भेटण्यासाठी ते गावी आले होते. 2 जानेवारीच्या सकाळपर्यंत ते सोशल मीडियावर सक्रिय होते. मात्र, त्यानंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला. वडिलांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या मुलाने शोध घेण्यास सुरुवात केली.

गावातील सरपंच आणि नातेवाईकांकडे चौकशी करूनही काहीच माहिती न मिळाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. शिऊर पोलिसांनी रविवारी दुपारी दिवेकर यांच्या बळ्हेगाव येथील घराची झडती घेतली. यावेळी नानासाहेबांचा मोबाईल पलंगाखाली सापडल्याने संशय बळावला. घराच्या शेजारील पडीक जागेत ताजी माती उकरलेली दिसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष तेथे खोदकाम केले. सायंकाळी ६:३० च्या सुमारास नानासाहेबांचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन संशयित ताब्यात घेण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, नातेवाइकांच्या जबाबात मोठी तफावत आढळल्याने पोलिसांनी संशयावरून नात्यातीलच तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा खून कौटुंबिक वादातून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शिऊर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
महाराष्ट्राचे भाग्य! महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी डॉ. सदानंद दाते…
मुंबई! पोलिसकाकाला वर्षाचा शेवटचा दिवस ठरला जीवघेणा…
मुंबईत महिला पोलिसाचा सासरच्या मंडळींकडून छळ; नवरा पोलिस ठाण्यात आला अन्…
पुणे शहरातील २०२५ मधील गुन्हेगारी वास्तव आणि पोलिस आयुक्तांचे धडाकेबाज निर्णय…

