पुणे पोलिसात भरती मोठा घोटाळा! नोकरी जाणार…

पुणे: राज्य सरकारच्या खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत, ‘कुराश’ या खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर केली. पुणे शहर पोलिस दलात भरती झालेल्या १९ जणांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सर्व बोगस उमेदवारांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात येणार असल्याची स्पष्ट माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. १९ बनावट उमेदवारांपैकी १० जणांना अद्याप सेवेत हजर करून घेण्यात आले नव्हते. तर उर्वरित ९ जणांना विविध पोलिस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर, त्या ९ जणांनाही तात्काळ प्रशिक्षण केंद्रातून परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे शहर पोलिस दलाच्या २०२४-२६ मधील भरती प्रक्रियेदरम्यान कुराश आणि ड्रॅगनबोट खेळाची बनावट प्रमाणपत्रे वापरून १९ उमेदवार भरती झाल्याची गुप्त माहिती एका सजग नागरिकाने पोलिसांना दिली होती. त्यांनी पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीत कुराश खेळाच्या प्रत्यक्ष कोणत्याही स्पर्धा आयोजित न करताच, त्या झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. यानंतर बोगस प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

या प्रकरणाचा अधिक तपास करत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांच्यासह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालकांचाही समावेश असून, त्यांच्याच केंद्रांवर ही बोगस प्रमाणपत्रे तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती मोठी असून, कुराश खेळाच्या तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या १९ संघटनांची माहिती गुन्हे शाखेने संकलित केली आहे. या संघटना चालवणाऱ्या संशयित पदाधिकाऱ्यांचीही कसून चौकशी केली जाणार आहे. या बनावट प्रमाणपत्रांच्या प्रकरणात सहभागी असणाऱ्या इतर व्यक्तींवरही लवकरच कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…

क्यूआर कोड, एआय व्हॉईससारख्या बनावट ॲप्सपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन…

आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!