
आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची कारवाई…
पुणे: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीदरम्यान बुडून मृत्यू झालेल्या ८ विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेनंतर, प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कोणत्याही प्रकारच्या अधिकृत परवान्याशिवाय आणि ना हरकत प्रमाणपत्राशिवाय आळंदीत बेकायदेशीरपणे चालवली जाणारी ‘विनर्स अकॅडमी’ ही खासगी शिकवणी संस्था, आळंदी नगरपरिषदेने शुक्रवारी सील केली आहे.
गुरुवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत, आळंदीच्या विनर्स अकॅडमीचे ४८ विद्यार्थी आणि शिक्षकांचे पथक (२५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक) दिवेआगर बीचवर सहलीला गेले होते. समुद्राच्या पाण्याचा खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने, १६ वर्षे वयोगटातील ८ विद्यार्थी खोल पाण्यात गेले आणि पाण्याचा लाटेने ओढून नेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर शुक्रवारी आळंदी नगरपरिषदेने तातडीने पावले उचलत आदेश जारी केला. कार्यालयाच्या दस्तऐवजांची पडताळणी केली असता, विनर्स अकॅडमीने व्यावसायिक कामकाज सुरू करण्यासाठी नगरपरिषदेकडून कोणताही वैध परवाना घेतलेला नाही. प्रथमदर्शनी ही संस्था कोणतीही परवानगी न घेता बेकायदा चालू असल्याचे स्पष्ट झाले, असे नगरपरिषदेच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ अंतर्गत कारवाई करत ही इमारत तातडीने सील करण्यात आली असून, अधिकाऱ्यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सहलीदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्या आठ विद्यार्थ्यांचे पार्थिव आळंदीत पोहोचल्यानंतर, संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून, प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. आळंदीत शुक्रवारी सकाळी शेकडो नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी या दुर्दैवी विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप दिला. विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूमुळे आळंदीतील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला, असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. आणखी दोन विद्यार्थ्यांवर आळंदीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, तर दोन विद्यार्थ्यांचे पार्थिव अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि अमरावती येथे नेण्यात येणार असून, तेथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

