
अमेरिकेतील ओहायोमध्ये स्वामीनारायण मंदिरावर समाजकंटकांचा विटा फेकून हल्ला; सुदैवाने जीवितहानी नाही…
वॉशिंग्टनः अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ग्रेटर क्लीव्हलँड परिसरातील श्री स्वामीनारायण हिंदू मंदिरावर समाजकंटकांनी विटांनी हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी मंदिरात पुजारी आणि अनेक भाविक उपस्थित होते.
‘कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ (कोहना) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. ओहायो राज्यातील रिचमंड हाइट्स येथील श्री स्वामीनारायण हिंदू मंदिर वडतालधामला लक्ष्य करण्यात आले होते. हल्लेखोरांनी मंदिरावर विटा फेकून त्याच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याचे अधिकृत वृत्त नाही.
‘कोहना’ने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. रिचमंड हाइट्सच्या महापौर किम थॉमस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला या जातीय द्वेषाविरुद्ध आवाज उठवण्याचे आणि गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन या संघटनेतर्फे करण्यात आले आहे. तथापि, या प्रकरणात अद्याप कोणालाही संशयित म्हणून ओळख पटविण्यात आलेली नाही किंवा अटक करण्यात आलेली नाही.
हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेतील हिंदू समुदाय ‘हिंदू वारसा महिना’ साजरा करण्यास सुरवात करत आहे आणि पवित्र नवरात्रीचा सणही लवकरच येणार आहे. या हल्ल्यानंतर, ‘कोहना’ने अमेरिकेत हिंदू मंदिरे आणि समुदायांविरुद्ध द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आपल्या निवेदनात, संस्थेने अलिकडच्या वर्षांत हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचाही उल्लेख केला.
सतत घडणाऱ्या घटनांनंतर, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय आणि हिंदू समुदायाच्या लोकांमध्ये सुरक्षेबद्दल तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

