राजस्थानच्या अलवरमध्ये कात्रीच्या साह्याने स्वतःच्या दोन मुलांची हत्या करून महिलेची आत्महत्या…

अलवर: राजस्थानच्या दतिया गावात रविवारी एका महिलेने आपल्या दोन मुलांवर कात्रीच्या साह्याने हल्ला करून त्यांचा जीव घेतला आणि नंतर स्वतः त्याच कात्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृत व्यक्तीची ओळख उषा शर्मा अशी पटली असून, तिच्या मानेवर अनेक खोल जखमा झाल्या होत्या आणि शर्थीचे वैद्यकीय उपचार करूनही त्यांचा मृत्यू झाला. चार वर्षांच्या नंदिनी नावाच्या मुलीला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. दुसरा मुलगा मुकुल (वय ५) याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सीपीआर देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक पोलीस आणि सर्कल ऑफिसर (सीओ) जोगिंदर सिंग यांनी प्रकरणाच्या तपासासाठी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उप जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उषाने रविवारी आपल्या मुलीला बाहेर खेळायला जाण्यास मनाई केली होती. त्यानंतर, तिने दोन्ही मुलांना घरातील एका खोलीत नेऊन दरवाजा बंद केला. किंकाळ्या ऐकून शेजारी आणि कुटुंबाचे नातेवाईक धावत आत आले आणि त्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोचल्यावर त्यांना दोन्ही मुले आणि महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. नंतर त्या तिघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर या घटनेमागील खरी कारणे स्पष्ट होतील, असे ठाणे अंमलदाराने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!