शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात…
मुंबईः दसरा मेळावा आटोपून आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिंदे गटाच्या तीन बसचा शहापूरजवळ कळंभे गावाजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 25 जण जखमी झाले आहेत. शिंदे गटाचे शिवसैनिक मुंबईहून सिल्लोडला जात असताना हा अपघात झाला. एका बसला ट्रकने मागून धडक दिली, त्याच वेळी धडक देणाऱ्या ट्रकला पाठी मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने मागून धडक दिल्याने बस पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शहापूर केंद्राचे कर्मचारी, शहापूर पोलीस मदतीला घटनास्थळी दाखल झाले. सध्या जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एक ट्रक आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाला. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या. यात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या. इतर दोन बसचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य आणि वाहने हटवण्याचे काम केले आहे.
निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!