शौचालयातील विषारी वायूमुळे दोन तरुणांचा मृत्यू; राम मंदिर परिसरातील घटनेने खळबळ…

मुंबई: गोरेगाव (पूर्व) येथील राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात संशयित रासायनिक विषारी वायूमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात प्रभाकर धनिवार (वय २४) आणि भाविन देसाई (वय १८) या दोघांचा मृत्यू झाला असून मुंबई अग्निशमन दल, पोलिस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिकेच्या अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

गोरेगाव पूर्व राम मंदिर येथील मृणालताई गोरे पूलाजवळ, पारशी पंचायत गेटसमोरील सार्वजनिक शौचालयात तीव्र रासायनिक वास येत असल्याची माहिती रविवारी सकाळी नागरिकांनी प्रशासनाला दिली. शौचालयामध्ये तीव्र दुर्गंधी आणि गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

या घटनेत दोन जण बेशुद्ध झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभाकर धनिवार आणि भाविन देसाई या दोघांना उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शौचालयात साचलेल्या विषारी वायू किंवा संशयित रासायनिक गळतीमुळे गुदमरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस, रुग्णवाहिका सेवा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेचे संबंधित विभागीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करण्यात आली असून हवेचे नमुने आणि इतर तांत्रिक तपासणी केली जात आहे.

दरम्यान, सार्वजनिक शौचालयामध्ये विषारी वायू निर्माण होण्यामागचे कारण, कोणत्याही रसायनाची गळती झाली होती का, तसेच मृत्यूचा नेमका संबंध कोणत्या घटकाशी आहे, याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक तपासणी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!