
Live व्हिडिओ कॅमेऱ्यासमोरच स्टार इन्फ्लुएन्सरला मारली गोळी…
मेक्सिको: मेक्सिकोचं उत्तर-पश्चिम राज्य सिनालोआमध्ये एका बंदूकधाऱ्याने लाईव्हस्ट्रीम सुरू असतानाच एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. लॅटिन अमेरिकन देशांमध्ये सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तींना टार्गेट करून हत्या केली जात आहे. यात आता आणखी एका सोशल मीडिया स्टारचा समावेश झाला आहे.
सीझर गॅस्टेलम (César Gastélum) असे हत्या झालेल्या इन्फ्लुएन्सरचे नाव आहे. सिनालोआ राज्याची राजधानी कुलियाकन येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये तो KFC च्या पार्किंगमध्ये इतर दोन जणांसोबत बोलताना दिसत आहे. तितक्यातच तिथे एका मोटरसायकलवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले. त्यातील एकाने बंदूक काढून थेट गॅस्टेलमवर अंदाधुंद गोळीबार केला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
View this post on Instagram
प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, गॅस्टेलमने काही दिवसांपूर्वी असे व्हिडिओ पोस्ट केले होते, ज्यामध्ये एका गुन्हेगारी टोळीचा थेट उल्लेख केला होता. मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शेनबॉम यांनी या घटनेची दखल घेत गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
सीझर गॅस्टेलम हा सोशल मीडियावर लोकप्रिय होता. त्याचे टिकटॉकवर ६ लाख ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते, तर इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवरही त्याचा मोठा चाहतावर्ग होता. विनोदी व्हिडिओ आणि मेक्सिकन प्रादेशिक संगीतावर आधारित कंटेंट तो नेहमी पोस्ट करत असल्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ होत होती. मात्र, लाईव्ह कॅमेऱ्यासमोरच त्याचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

