महिला गोविंदा पथकातील महिलांनी बिस्किटाचे आवरण पेट्रोल पंपाच्या आवारात टाकल्यावरून केला राडा…

विरार: बिस्किटाचे आवरण पेट्रोल पंपाच्या आवारात टाकल्यानंतर चालू झालेल्या वादाचे पर्यवसान, थेट हाणामारीत झाल्याची घटना विरार पश्चिमेतील वटार परिसरात घडली. दहीहंडीनंतर सहलीसाठी नवापूरला गेलेल्या मुंबईतील एका महिला गोविंदा पथकाच्या सदस्यांचा, मनवेल पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. त्यानंतर एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने तो जखमी झाला. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी दहीहंडी उत्सव पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित महिला गोविंदा पथक लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह नवापूर येथील राजहंस रिसॉर्टमध्ये सहलीसाठी गेले होते. दिवसभराचा कार्यक्रम आटोपून रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता ते मुंबईच्या दिशेने परतत होते.

वटार येथील मनवेल पेट्रोल पंपावर बसमध्ये डिझेल भरण्यासाठी ते थांबले. यावेळी बसमधील एका मुलाने बिस्किटाचे रिकामं आवरण बसच्या खिडकीतून बाहेर टाकले. त्यावर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने आक्षेप घेत, इथे अशा प्रकारे कचरा फेकू नका, असे सांगून कचरा उचलण्यास सांगितले. याच मुद्द्यावरून बसमधील काही महिला आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद सुरू झाला.

वाद वाढल्यानंतर बसमधील आणखी काही महिला खाली उतरल्या. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पेट्रोल पंप मालकाने मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

काही वेळाने परिस्थिती निवळली होती. मात्र, त्यानंतर बसमधील एका तरुणाने संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी बसची चावी काढून घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकारामुळे परिसरात जवळपास दोन तास गोंधळाचं वातावरण होते. स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

दरम्यान, या वादाबाबत महिला गोविंदा पथकातील सदस्यांनी वेगळी बाजू मांडली आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने बसमधील एका ज्येष्ठ नागरिकाशी अयोग्य भाषेत संवाद साधल्याने वाद वाढल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच बसची चावी काढून घेतल्यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना जवळपास दोन तास तिथेच थांबावे लागल्याचंही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा अर्नाळा सागरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!