
गुप्तधनाच्या नावाने जेसीबीने खणला खड्डा अन् प्राध्यापकाला पुरलं; पोलिसांनी केला गुन्हा उघड…
छत्रपती संभाजीनगर: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे यांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. आरोपींनी प्राध्यापकाचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत प्राध्यापक आणि आरोपींमध्ये सुमारे 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. ‘खतरों के खिलाड़ी’ सारखा टीव्ही शो तयार करून पैसे कमावण्याच्या उद्देशाने हा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, पैसे घेतल्यानंतरही बराच काळ कोणताही शो सुरू न झाल्याने प्राध्यापक लोंढे आरोपींकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. सततच्या तगाद्यामुळे आरोपींनी प्राध्यापकांना दौलताबाद येथे पार्टीसाठी बोलावले. तेथे पार्टी झाल्यानंतर परत येताना आरोपींनी प्राध्यापकांच्या स्वतःच्या पिस्तुलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून खून केला. त्यानंतर शहरातील एका रुग्णालयाजवळ येईपर्यंत त्यांचा मोबाईल ऑन ठेवण्यात आला, जेणेकरून ते जिवंत असल्याचा भास निर्माण होईल.

यानंतर आरोपींनी मृतदेह गाडीत ठेवून दुसऱ्या दिवशी शहरालगत असलेल्या गेवराई तांड्याजवळ गुप्तधन असल्याची माहिती एका जेसीबी चालकाला दिली. त्याच्याकडून दोन खड्डे खणून घेतले आणि पहाटे प्राध्यापकांचा मृतदेह त्यामध्ये पुरला. खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा बनाव केला. तसेच मृत राजाराम लोंढे यांचा मोबाईल वारंवार ऑन-ऑफ करण्यात आला. त्यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याची खोटी माहितीही दिली. याप्रकरणी 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्राध्यापक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी तपासादरम्यान संशयित विशाल राठोड आणि आकाश पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दोघांची स्वतंत्र चौकशी केली असता त्यांच्या जबाबांमध्ये विरोधाभास आढळून आला आणि पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली असता खुनाचा संपूर्ण प्रकार उघड झाला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नगर हादरलं! कीर्तनकार महाराजकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वारकरी संप्रदायला काळिमा…
पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…
पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…
बीड हादरलं! विवाहित युवतीवर अत्याचार करत चावडीत ठेवलं बांधून…

