
होर्मुझच्या खाडीत गेल्या दोन दिवसांत तेलाच्या टँकरवर दुसरा हल्ला; जहाजावरील भारतीय खलाशी सुरक्षित…
नवी दिल्ली: लायबेरियन ध्वज असलेल्या ‘एमटी नॅव्हिग-८ मेस्सी’ या कच्च्या तेलाच्या टँकरवर, बुधवारी पर्शियन आखातातील होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पोचत असताना एक क्षेपणास्त्र आदळले. जहाजावरील तीन भारतीय खलाशांसह सर्व कर्मचारी वर्ग सुरक्षित आहे. या घटनेनंतर भारतीय अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे, की हा हल्ला १८ नोव्हेंबर रोजी झाला. जहाजावरील तीन भारतीय नागरिक आणि इतर सर्व कर्मचारी सुरक्षित असून, त्यांची नोंद घेण्यात आली आहे. कोणीही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, एका भारतीय अधिकाऱ्याला प्रथमोपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
ते म्हणाले, की सरकार जहाज व्यवस्थापन कंपनीच्या सतत संपर्कात असून, सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
जगभरातील ऊर्जा पुरवठा आणि तेल वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या सुरक्षेबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. १६ नोव्हेंबर रोजी पनामाचा ध्वज असलेल्या ‘एमटी तारा गॅस’ या एलपीजी टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी हा हल्ला झाला आहे. या टँकरवर चोवीस भारतीय खलाशी होते.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एमटी तारा गॅस जहाजावरील २४ पैकी २१ भारतीयांना ओमानमधील खसाब शहरात सुखरूप हलवण्यात आले आहे. दोन जखमी भारतीय नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एक भारतीय खलाशी अद्याप बेपत्ता आहे. ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बेपत्ता खलाशाच्या शोध आणि बचाव कार्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मंत्रालयाने बचाव कार्यात त्वरित मदत केल्याबद्दल ओमान सरकारचे आभारही मानले.

