फटाक्यांमुळे लागलेल्या आगींमध्ये मध्य प्रदेशात १३ तर दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, ओडिशात ७ जण मृत्यूमुखी…

नवी दिल्ली: देशभरात अनेक दुःखद घटनांमुळे दिवाळीचा उत्सवावर विरजण पडले असून, आगीच्या दुर्घटना आणि फटाक्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशात आगीच्या तीन भीषण दुर्घटनांमध्ये १३ लोकांचा बळी गेला, तर दिल्लीत हातात फटाका फुटल्याने एका १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

राजस्थानच्या पाली येथील फलना शहरात फटाक्यांच्या दुकानात आग लागल्याने काँग्रेसच्या एका नगरसेविकेचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ गंभीररित्या भाजला. ओडिशातील कटक येथे आज पहाटे घरात आग लागल्याने एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचे आजोबा गंभीर जखमी झाले. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येही आगीच्या अनेक घटना आणि जखमी झाल्याची नोंद झाली आहे.

मध्य प्रदेशात दिवाळीच्या रात्री कटनी आणि सिवनी जिल्ह्यांमध्ये दोन वेगवेगळ्या घरांना लागलेल्या आगीत दोन कुटुंबांतील १२ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत, उज्जैनमध्ये आगीच्या दुर्घटनेत एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला.

सिवनी जिल्ह्यातील छपरा शहरात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सराफा व्यापारी कुंदन सोनी यांच्या निवासस्थानी आग लागल्याने एकाच कुटुंबातील किमान सहा जणांचा मृत्यू झाला. दोन अल्पवयीन मुलांसह कुटुंबातील इतर चार सदस्यांना वाचवण्यात आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागली तेव्हा घरात दहा जण उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे.

कटनी जिल्ह्यातील बरही शहरात तीन मजली इमारतीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या इमारतीच्या तळमजल्यावर भांडीकुंडीचे दुकान होते आणि हे कुटुंब वरच्या मजल्यावर राहत होते. छतरपूर जिल्ह्यात दिवाळी साजरी करताना फटाके फोडताना सुमारे ३५ ते ४० जण भाजल्याचे वृत्त आहे.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसह विविध वयोगटातील रुग्णांना उपचारासाठी आणण्यात आले होते. काहींना प्रथमोपचार देऊन घरी सोडण्यात आले, तर इतरांना आवश्यक उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

दिवाळीच्या सणादरम्यान गनपावडर आणि फटाक्यांमुळे भाजल्याची शेकडो प्रकरणे आली आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश असून, सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. काही रुग्णांना प्राथमिक प्रथमोपचार दिल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत अंदाजे ३५ ते ४० रुग्ण आले आहेत, अशी माहिती डॉ. राजेश मिश्रा यांनी दिली.

राजधानी दिल्लीत दिवाळीच्या उत्सवादरम्यान, नरेला येथील एका १० वर्षांच्या मुलाचा फटाके उडवत असताना हातात फटाका फुटल्याने मृत्यू झाला. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात मुलगा गंभीर जखमी झाला होता आणि त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!