पुणे पोलिस आयुक्तालयात गिफ्टधारकांना पायघड्या, सर्वसामान्य नागरिकांना कात्रजचा घाट!

पुणे (संतोष धायबर): पुणे पोलिस आयुक्तालयात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मागण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागत असताना, गिफ्ट घेऊन येणाऱ्यांना मात्र पायघड्या घातल्या जात असल्याची चर्चा सध्या आयुक्तालयात रंगली आहे. पुढच्या दाराने येणारी गिफ्ट मागच्या दाराने व्यवस्थित बाहेर जात असल्याची कुजबूजही ऐकायला मिळत आहे. एकीकडे तक्रारदारांना अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वेळ मिळत नाही, तर दुसरीकडे गिफ्ट धारकांना सहज प्रवेश मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे आयुक्तालयात नेमके कोणाला प्राधान्य दिले जाते, असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयात दररोज अनेक नागरिक आपल्या तक्रारी आणि समस्या घेऊन येतात. पोलिसांकडून न्याय मिळावा, आपली व्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावी, या अपेक्षेने नागरिक आयुक्तालयात येतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांना अनेकदा तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. अधिकारी भेटतील या आशेने बसलेल्या नागरिकांना भेट न घेताच हताषपणे परतावे लागत आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गिफ्ट घेऊन येणाऱ्यांना मात्र तत्काळ भेटी मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एक नियम आणि गिफ्टधारकांसाठी दुसरा नियम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पीडित मायलेकी दोन दिवसांपासून हेलपाटे; न्यायासाठी वणवण
एका युवतीला आणि तिच्या आईला मारहाण करण्यात आली होती. शिवाय, संबंधित युवतीचा विनयभंग झाल्याचीही तक्रार आहे. या प्रकरणात न्याय मिळावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, या अपेक्षेने दोघी मायलेकी गेल्या दोन दिवसांपासून पोलिस आयुक्तालयात चकरा मारत आहेत. मात्र, त्यांना भेट मिळू शकली नाही. सणासुदीचे दिवस असतानाही दोन दिवस आयुक्तालयात बसून राहावे लागत आहे. न्याय मिळत नसेल तर दाद मागायची कोणाकडे, असा हताश सवाल या महिलांनी उपस्थित केला. गिफ्ट घेऊन येणारे थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात. मात्र, सामान्य नागरिकांच्या गर्दीत एकही गिफ्टधारक बसलेला दिसत नाही. यावरून परिस्थिती लक्षात येते, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने केली आहे.

कर्करोगग्रस्त वृद्ध महिलेलाही प्रतीक्षेचा त्रास
एका वृद्ध महिलेला कर्करोगाने ग्रासले आहे. त्या आपल्या तक्रारीसंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पोलिस आयुक्तालयात हेलपाटे मारत होत्या. मात्र, त्यांनाही भेटीची वेळ मिळू शकली नाही. तब्बल चार तास प्रतीक्षा केल्यानंतर प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी अखेर हताशपणे घरी जाण्याचा निर्णय घेतला. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या वृद्ध महिलेला चार-पास तास बसावे लागत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची दखल कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आयुक्तांना मेसेज करताच तातडीने दखल!
न्याय मिळत नसल्याने आणि चार तास बसलेल्या एका पीडित महिलेने थेट पोलिस आयुक्तांना मेसेज केला. मेसेज मिळताच पोलिस आयुक्तांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून महिलेच्या तक्रारीबाबत विचारपूस केली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. पोलिस आयुक्त चांगले आहेत. त्यांच्यापर्यंत तक्रार पोहोचली की तातडीने काम होते. मात्र, प्रत्येक नागरिकाने आयुक्तांनाच मेसेज करायचा असेल, तर पोलिस ठाणी आणि आयुक्तालयातील यंत्रणेची गरज काय? असा रास्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या मनिषा नाईक यांनी उपस्थित केला आहे.

गिफ्टचे नियोजन करणारी युवती कोण?
पुणे पोलिस आयुक्तालयात सध्या गिफ्टची जोरदार चर्चा सुरू आहे. गिफ्ट घेऊन येणाऱ्यांना सहज प्रवेश मिळतो. पुढील दाराने आलेली गिफ्ट मागच्या दाराने व्यवस्थित बाहेर जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या सगळ्या व्यवस्थेचे नियोजन करणारी युवती कोण? तिची नेमकी भूमिका काय? तिला कोणाचे पाठबळ आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चर्चेत तथ्य किती, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. मात्र, अशा चर्चांमुळे पोलिस आयुक्तालयाच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कुंपणच शेत खात असेल तर दाद मागायची कोणाकडे?
सामान्य नागरिक न्यायाच्या अपेक्षेने पोलिस आयुक्तालयात येतात. मात्र, तक्रारदारांना भेटीसाठी तासन्तास थांबावे लागत असेल आणि काहींना सहज प्रवेश मिळत असल्याची भावना निर्माण होत असेल, तर हा गंभीर विषय आहे. पीडित महिला, कर्करोगग्रस्त वृद्ध महिला यांना प्रतीक्षा करावी लागणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन भेटींची व्यवस्था पारदर्शक करणे गरजेचे आहे. कुंपणच शेत खात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? असाही प्रश्न मनिषा नाईक यांनी उपस्थित केला आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्यात पोलिस कर्मचाऱ्याकडून कार घुसवण्याचा प्रयत्न अन्…

पुणे पोलिस दलातील पोलिसाचा कारनामा अन् सेवेतून बडतर्फ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!