
अभिनेता इम्रान खानची उच्च न्यायालयात धाव; ‘भारत सोडा’ नोटिसला आव्हान
मुंबई: अभिनेता इम्रान खान याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देणाऱ्या ‘भारत सोडा’ नोटिशीला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांना शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यास प्रतिबंध करणारी कोणतीही स्पष्ट तरतूद कायद्यात नसल्याचा युक्तिवाद, त्याच्या वकिलांतर्फे करण्यात आला आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यामुळे इम्रानला ही नोटीस बजावण्यात आली होती.
‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ (भारतीय वंशाचे परदेशी नागरिक). उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती भारतात जन्मलेली किंवा भारतीय वंशाची असली, पण तिने अमेरिकेचे, ब्रिटनचे किंवा इतर देशाचे नागरिकत्व घेतले असेल, तर तिला ‘ओसीआय’ कार्ड मिळू शकते. या कार्डधारकांना भारतात वारंवार व्हिसा घेण्याची गरज नसते आणि त्यांना भारतात दीर्घकाळ राहण्यासह काही विशेष सुविधा मिळतात.
माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे नागरिकत्व असलेला आणि ‘ओसीआय’ कार्डधारक असलेला इम्रान खान (वय ४३) १० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलक या ठिकाणी जमले होते.
या आंदोलनादरम्यान पोलिसांनी इम्रानला काही काळ ताब्यात घेतले होते. त्यानंतर परदेशी नागरिकांसंदर्भातील कायद्याचे कथित उल्लंघन केल्याच्या आरोपावरून, त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देणारी नोटीस बजावण्यात आली.
या नोटिशीविरोधात इम्रान खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचे वकील झुल्फिकार मेमन यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत, नोटिशीच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. ‘ओसीआय’ कार्डधारकाला शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यास कायद्यात स्पष्ट मनाई नसल्याचा युक्तिवाद त्याच्या बाजूने करण्यात आला आहे.
इम्रान खानच्या वकिलांनी आंदोलनात सहभागी झाल्याच्या आरोपावर प्रश्न उपस्थित केले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इम्रान खान नाना चौक परिसरातून जात असताना रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि त्यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्याच्याजवळ आले, असा बचाव पक्षाचा दावा आहे. त्यामुळे तो प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी झाला होता की केवळ त्या परिसरातून जात होता, हे स्पष्ट करण्यासाठी संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याची मागणी त्याचे वकील करणार आहेत.
इम्रान खानची बाजू मांडणारे वकील झुल्फिकार मेमन यांनी या प्रकरणातील आरोपांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उत्तर देण्याचा इरादा व्यक्त केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढावे, म्हणजे सर्व काही स्पष्ट होईल, असे मेमन यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणाची सुरवात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी इम्रान खानविरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर झाली. अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या इम्रानला सरकारच्या धोरणाविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद सोमय्यांनी केला होता. इम्रान खान हा ओसीआय कार्डधारक असून, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या निदर्शनांदरम्यान त्याला काही काळ ताब्यात घेण्यात आले होते.
आता इम्रानच्या बचाव पक्षाकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तो नेमका कुठे होता आणि त्याने आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता का, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पुराव्यांच्या आधारे ‘भारत सोडा’ नोटिशीला दिलेल्या आव्हानात बचाव पक्ष आपली बाजू मांडू शकतो.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रानला बजावण्यात आलेल्या नोटिशीत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५ मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. या कायद्यानुसार परदेशी नागरिकांच्या भारतातील प्रवेश, वास्तव्य आणि देशातून निर्गमन यासंदर्भातील नियमांचे नियमन केले जाते. संबंधित तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. मात्र, आंदोलनातील सहभागामुळे कायद्याचे उल्लंघन झाले का, हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
अभिनेता इम्रान खानला ऑक्टोबरअखेरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याच्या वृत्तानंतर आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर या प्रकरणासंदर्भातील वृत्त शेअर करत इम्रान खानला पाठिंबा दर्शवला. ४३ वर्षांपैकी ४० वर्षे त्याने भारतात घालवली. इथेच शिक्षण घेतले, इथेच काम केले, यश मिळवले, अपयशही पाहिले, प्रेम केले आणि संघर्षही केला, अशा शब्दांत त्यांनी इम्रानच्या भारताशी असलेल्या नात्यावर भर दिला.

