
उद्योगपती अनिल अंबानी यांची २,०३२ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; परकीय चलनकायद्यांतर्गत कारवाई…
मुंबई: देशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाहीत. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत त्यांची ९ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यातच, रिलायन्स पॉवर लिमिटेडची भारतातील २,०३२.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कलम ‘३७ अ’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त मालमत्तेत रिलायन्स पॉवरच्या बँक खात्यातील रक्कम आणि सासन पॉवर लिमिटेडमधील भागीदारीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
अनिल अंबानी यांनी परदेशात बेकायदेशीररीत्या ठेवलेल्या परकीय चलनाच्या सममूल्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ‘सेबी’कडून मिळालेल्या माहितीनंतर ईडी या प्रकरणी अधिक तपास करत आहे. कंपनीच्या खात्यांमध्ये २,१०१.४६ कोटी रुपयांच्या राइट ऑफ आणि तरतुदींची नोंद केली आहे. ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि केमन आयलंड्समधील कंपन्यांतील परदेशी गुंतवणूक आणि ॲडव्हान्सच्या व्यवहारांची चौकशी. तसेच, २००६ मध्ये रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेडने परकीय चलन परिवर्तनीय रोख्यांद्वारे ३०० दशलक्ष डॉलर उभारले आहेत. त्यापैकी २७५ दशलक्ष डॉलर सिंगापूरस्थित उपकंपनीत गुंतवण्यात आल्याचा आरोप आहे. या निधीच्या आधारे ‘बीव्हीआय’मधील कंपन्यांना कर्ज देण्यात आले. या कंपन्यांचे नियंत्रण भारतातून रिलायन्सच्या अनिल अंबानी समूहाकडून होत असल्याचा आरोप असल्याने ईडीतर्फे तपास सुरू आहे.
दरम्यान, मॉरिशसमधील परदेशी संस्थांमार्फत भारतात तात्पुरता निधी परत आणल्याचा आणि उर्वरित निधी परदेशात ठेवल्याचा आरोप करण्यात आला असून, कर्जाची परतफेड झाली नसल्याने व्यवहार वैध व्यावसायिक असल्याचे भासवण्यासाठी मागील तारखेची कागदपत्रेही त्यांनी तयार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील अनिल अंबानी यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मोठी संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे, अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढतच असल्याचे दिसून येते. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर ईडीकडून नोव्हेंबर २०२५ मध्ये कारवाई करण्यात आली होती. तेव्हा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं रिलायन्स ग्रुपशी संबंधित १४०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. यापूर्वीच ईडीने अनिल अंबानी यांची एकूण ९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे.

