दिल्लीच्या सीमापुरी भागात इमारत कोसळून चार जण मृत्यूमुखी, आठ जण जखमी…

नवी दिल्ली: ईशान्य दिल्लीतील सीमापुरी परिसरात बुधवारी (ता. ७) चार मजली इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आणि तीन वर्षांच्या मुलासह किमान आठ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.

आज (गुरुवारी) सकाळी ढिगाऱ्याखालून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत दोन मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीचा, एका गर्भवती महिलेचा आणि सुमारे दीड वर्षाच्या एका मुलाचा समावेश आहे. डोके धडापासून वेगळे झालेल्या मुलाचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला असून, अन्य आठ जणांना जखमी अवस्थेत वाचवण्यात यश आले असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

मंगळवारी संध्याकाळी उत्तराखंडमध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारतीला पडलेल्या भेगांमुळे ही घटना घडली असावी, असा अधिकाऱ्यांना संशय आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे आवाज ऐकू येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

इमारत कोसळण्याचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) म्हणण्यानुसार, शेजाऱ्यांनी दावा केला आहे की भूकंपानंतर इमारतीच्या रचनेला तडे गेले होते आणि इमारतीचा मालक ती रिकामी करण्याच्या प्रक्रियेत होता.

दिल्ली अग्निशमन सेवेला (डीएफएस) दुपारी सुमारे ३:३० वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या. दिल्ली पोलीस, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), एमसीडी आणि दिल्ली शहरी निवारा सुधारणा मंडळ (डीयूएसआयबी) यांच्या पथकांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले.

या इमारतीसोबतच शेजारच्या इमारतीच्या भिंतीही कोसळल्या असून, या घटनेच्या प्रभावामुळे जवळच्या मशिदीची संरक्षक भिंतही ढासळली आहे, असे महापालिकेने सांगितले.

एमसीडीने सांगितले की, स्थानिक चौकशीअंती, त्या परिसरात कचरा वेचणारी कुटुंबे राहत होती आणि इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकण्यापूर्वी त्यांपैकी काही जण प्लास्टिक आणि इतर साहित्य गोळा करत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!