टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोन फरार आरोपींना पोलिसांकडून अटक…

भिवंडीः टीईटी पेपरफुटी प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. या आरोपींना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या आरोपींच्या अटकेनंतर टीईटी प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या १८ वर पोहोचली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. प्रकाश मिसाळ (रा. बीड) व अशोककुमार बाबूलाल शाव (रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. प्रकाश मिसाळ याला बीड येथून तर अशोक कुमार शाव याला बिहार राज्यात जाऊन अटक करण्यात आली आहे.

टीईटी पेपर फुटी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी कपिल दहिया हा प्रकाश मिसाळ याला पुण्यात भेटण्यासाठी आला होता. एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली होती. त्यावेळी टीईटी परीक्षेच्या पेपर संदर्भातील खरेदी विक्रीबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

दुसरा आरोपी अशोककुमार शाव याच्या बिहारमधील राहत्या घरातून तपास पथकाने १४९ लोकांच्या नावाची यादी पोलीसांनी जप्त केली आहे. या यादीत टीईटी परीक्षेला बसलेल्या १८ परीक्षार्थींची नावे असल्याचे तपासात समोर आले आहे.

त्यामुळे या यादीतील व्यक्तींशी आरोपींनी काही आर्थिक व्यवहार केले आहेत का यासंदर्भात तपास सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. तपासात आणखी काही महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय मराठे यांनी सांगितले.

या दोघांच्या अटकेमुळे आग्रा येथील छापखान्यात छापण्यात आलेल्या गोपनीय प्रश्नपत्रिका ते महाराष्ट्रात त्यांचे कथित वितरण आणि विक्रीचा प्रयत्न या संपूर्ण साखळीबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!