घराचे दार उघडताच समोर दिसले पत्नी व मुलाचे मृतदेह…

बारामतीः घराचे दार उघडताच समोर दिसले, ते पत्नी आणि मुलाचा मृतदेह पाहून पती विजय रामदास गावडे यांना प्रचंड धक्का बसला, आणि ते मटकन खालीच बसले. ही अनपेक्षित घटना का आणि कशी घडली, याचा ठाव काही लागू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्वरित तपास सुरू केला. ही घटना बारामतीत घडली आहे.

बारामती तालुक्यातील तांदुळवाडीतील दादा पाटीलनगरमध्ये राहणारे विजय गावडे, हे बारामती एमआयडीसीतील जीटीएन कंपनीत कामास आहेत. गुरुवारी रात्री ते कामासाठी बाहेर गेले आणि रात्रपाळी संपवून शुक्रवारी सकाळी घराकडे परतले. ते आले तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. अनेकदा दार वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनी पत्नी आणि मुलाचे नाव घेऊन जोरदार हाकाही मारल्या. अखेर त्यांनी शेजारी राहणारे सूरज भीमराव शिंदे यांना बोलावून घेतले. दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी जोरदार धक्के देऊन दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहताच त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. घरात समोरच पत्नी रमा (वय ४१) आणि मुलगा विवेक (वय १७) यांचे मृतदेह होते.

घरात गेल्यानंतर पत्नी आणि मुलगा बेशुद्ध झाले असावेत, या विचाराने त्यांनी पत्नीला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पत्नीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या मानेवर काळे व्रण दिसून आले. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी ते दोघेही मृत्यू पावल्याचे घोषित केले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास चालू आहे.

ही आत्महत्या आहे की हत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोस्टमॉर्टेमनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पषट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!