
हृदयद्रावक! पुणे शहरात आईच्या मृत्यूनंतर मुलाने घेतला जगाचा निरोप…
पुणे: रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आईचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने, मुलाने शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पर्वती परिसरात घडली आहे. आईच्या विरहाने खचून जात मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेनंतर माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आली. मंदा दोडके (वय 50) आणि साहिल गणेश दोडके (वय 25, रा. पर्वती दर्शन, पुणे) अशी या मृत पावलेल्या माय-लेकाची नावे आहेत.
दोडके कुटुंब हे मूळचे पुण्याच्या दांडेकर पूल परिसरातील रहिवासी आहे. मात्र, तिथे सध्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू असल्याने, हे कुटुंब काही दिवसांपूर्वीच पर्वती दर्शन परिसरात भाड्याच्या घरात राहायला आले होते. मृत मंदा दोडके या वृद्ध रुग्णांची सेवाशुश्रूषा करून कुटुंबाला हातभार लावायच्या. चार बहिणींनंतर जन्माला आलेला साहिल हा घरातील एकुलता एक मुलगा होता. पहाटे उठून दुधाच्या पिशव्या टाकणे आणि दिवसभर लिफ्ट दुरुस्तीची कामे करणे, असा त्याचा दिनक्रम होता.
View this post on Instagram
मंदा दोडके यांना गुरुवारी पहाटे अचानक अर्धांगवायूचा तीव्र झटका आला होता. साहिलने त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी सकाळी साहिल नेहमीप्रमाणे आपल्या आईसाठी चहा घेऊन रुग्णालयात गेला होता. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या आईचे निधन झाल्याचे सांगितले. साहिल याला मानसिक धक्का सहन न झाल्याने त्याने रुग्णालयातून तातडीने घर गाठले. घरात कोणीही नसताना त्याने गळफास लावून घेत जगाचा निरोप घेतला. एकाच वेळी आई आणि तरुण मुलगा गमावल्याने दोडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पर्वती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…
हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…
हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…
हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…

