सख्ख्या भावासाठी दिलेली ‘डमी’ परीक्षा भोवली; PSIला पोलिस कोठडी…

पुणे : आपल्या सख्या भावाला खाकी वर्दी मिळवून देण्यासाठी एका पोलिस उपनिरीक्षकाने चक्क ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाप्रमाणे ‘डमी’गिरीचा प्रयोग केल्याचे उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील या उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये थेट भावाच्या जागी बसून लेखी परीक्षा दिली होती. अखेर नऊ वर्षांनी बनाव उघडकीस आला असून, या उपनिरीक्षकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने या उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे असे अटक करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्यासह भाऊ गजानन शिवलाल गुसिंगे (दोघे रा. रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरोधात तोतयेगिरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासविणे, कट रचणे या भारतीय दंड संहितेच्या कलमांसह परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल २०१६ रोजी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर घडली होती.

पुणे शहर पोलिस दलातर्फे २०१६ मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या भरती प्रक्रियेत आरोपी गजानन गुसिंगे सहभागी झाला होता. त्याने पाच व सहा एप्रिल २०१६ रोजी मैदानी चाचणी परीक्षा दिली. त्यानंतर २४ एप्रिलला लेखी परीक्षेसाठी स्वतःऐवजी ‘डमी’ व्यक्तीला बसविले. त्यासाठी चक्क बनावट ओळखपत्रेही तयार केली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी गजाननचा आणि त्याच्या जागी परीक्षा देणाऱ्या तोतया व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेकडून या दोघांचा शोध घेण्यात येत होता. या लेखी परीक्षेच्या चित्रीकरणात गजाननच्या जागी लेखी परीक्षा देणारी तोतया व्यक्ती दिसत होती. ही व्यक्ती म्हणजे गजाननचा सख्खा भाऊ सुप्पडसिंग असल्याचे एका साक्षीदाराने सांगितले.

दरम्यानच्या काळात सुप्पडसिंग महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून माहिती मागविली असता, सुप्पडसिंगची २०२३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली असून, तो सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नियुक्त असल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा झाल्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज्य राखीव दल गट क्रमांक सात येथून आरोपी सुप्पडसिंगला अटक केली. आरोपी गजाननचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी बनावट ओळखपत्र कुठून तयार केली, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सहायक निरीक्षक दादासाहेब पाटील आणि सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. चेतन भुतडा यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपी उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे पोलिस दलातील धडाडीचे अधिकारी राजू बहिरट यांचा गौरवशाली प्रवास…

महिला पोलिस कॉन्स्टेबलमुळे फूटपाथवर झाली सुखरुप प्रसुती…

पोलिस अधिकारी स्वाती साठे दरडावून म्हणाल्या, संजू, तू बातों से मानेगा या लातों से…

जुगाराच्या नादात झालेले कर्ज फेडण्यासाठी पोलिस अधिकारीच बनला चोर…

पोलिस अधिकारी युद्धात सहभागी होऊ शकतात का? नियम घ्या जाणून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!