पुणे पोलिस दलातील धडाडीचे अधिकारी राजू बहिरट यांचा गौरवशाली प्रवास…

(संदिप कद्रे-पोलिसकाका)
पोलिस दलात पराक्रम, कर्तव्यनिष्ठा आणि निर्भयता यांची ओळख बनलेले राजू उर्फ बाळासाहेब प्रभाकर बहिरट वयोमानानुसार पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तब्बल ३९ वर्षे ८ महिने सेवाकारकाळात त्यांनी पुणे शहर पोलिस दलाला दिलेले योगदान अमूल्य, प्रेरणादायी आणि पुणेकरांच्या सुरक्षेसाठी अतुलनीय आहे. “नाम ही काफी है” असा दरारा त्यांनी येरवडा आणि पुणे शहराच्या अनेक भागांमध्ये निर्माण केला होता.

सेवेची सुरुवात – १९८६ पासून धडाडीचा प्रवास…
सन १९८६ साली बहिरट सर पुणे शहर पोलिस दलात दाखल झाले. शिरूर तालुक्यातील न्हावरे हे त्यांचे मूळ गाव. साधेपणातून आलेल्या या अधिकाऱ्यांनी सेवाभाव, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर पुणे पोलिस दलात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी चतुश्रुंगी, येरवडा, विश्रांतवाडी, भोसरी, बंडगार्डन, विशेष शाखा, गुन्हे शाखा अशा महत्त्वाच्या ठिकाणी सेवा बजावली. कुठलीही पोस्टिंग असो—धडाडी, तपासातील चपळाई आणि गुन्हेगारीवर आळा घालण्याची कमालीची क्षमता हे त्यांचे सर्वत्र ठळक वैशिष्ट्य राहिले.

गुन्हे तपासातील उल्लेखनीय कामगिरी…
पुणे शहरातील गंभीर गुन्हे उघडकीस आणताना बहिरट यांनी अनेक उच्च-प्रोफाइल प्रकरणांमध्ये मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या तपास कौशल्यामुळे गुन्हेगारीचे अनेक धागेदोरे उलगडले. गंभीर खुनाच्या २५ प्रकरणांची उकल केली.

उघड केलेली ठळक गुन्हे पुढीलप्रमाणे…
– येरवडा येथील रफिक शेख खुन खटला
– कल्याणीनगरातील पाटील हत्याकांड
– सागर लडकत खुन प्रकरण
– माजी नगरसेवक सतीश मिसाळ खुन प्रकरण
या सर्व प्रकरणांमध्ये त्यांच्या तपासाच्या धारदार कामगिरीने आरोपींचा पर्दाफाश झाला.

वाहनचोरी व घरफोडी प्रकरणे
– ९६ वाहनचोरी प्रकरणे उघडकीस, तब्बल ९४ लाखांचा माल परत
– ६९ घरफोडी प्रकरणांची उकल, २७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

फरारी आरोपींवर पकड
– परिमंडळ-३ स्कॉडमध्ये कार्यरत असताना १०१ फरारी आरोपी पकडण्यात त्यांनी निर्णायक योगदान दिले.

बँक दरोडे उघडकीस
पुणे शहरातील ६ बँक रॉबरी प्रकरणे उघडकीस आणण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका राहिली.

अंमली पदार्थाविरुद्ध धडाकेबाज कारवाई
गुन्हे शाखेत कार्यरत असताना तब्बल ५.५ कोटींचे ब्राऊन शुगर, कोकण (ड्रग), चरस इत्यादींची मोठी जप्ती करण्यात त्यांनी महत्वाचा वाटा उचलला.

एमपीडीए प्रस्ताव
पीसीबी येथे कार्यरत असताना केवळ एका वर्षात ११० एमपीडीए प्रस्ताव तयार करण्यास त्यांनी मदत केली, ही कामगिरी स्वतःमध्ये विक्रमी मानली जाते.

येरवडा परिसरात ‘बहिरट बंधू’ यांचा दहशतवाद्यांवरील वचक
१९९० ते २००0 या दशकात येरवडा परिसर गुन्हेगारीच्या सावटाखाली होता. या काळात बहिरट बंधूंचा दरारा आणि धाडसी कारवायांनी गुन्हेगारीला रोखण्यासाठी निर्णायक भूमिका निभावली. त्यांच्या धडाक्यामुळे त्या परिसरात दीर्घकाळ गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश बसला.

सन्मान, पुरस्कार आणि प्रशस्ती
– दीर्घ कारकिर्दीत त्यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त केले
– सेवेच्या काळात आजवर एकूण ४४१ पारितोषिके मिळवली, ही संख्या त्यांच्या परिश्रम, यशस्वी तपास कार्य आणि धाडसी सेवाभावाची साक्ष देते.

सेवानिवृत्त…
३० नोव्हेंबर २०२५ रोजी बहिरट हे पोलिस उपनिरीक्षक पदावरून नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या संपूर्ण सेवाकाळाचा विचार केला तर
३९ वर्षे ८ महिने हे केवळ एक आकडा नाही, तर एका समर्पित, धडाडीच्या, जनतेच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची विलक्षण गाथा आहे.

पुणेकरांचा अभिमान
राजु उर्फ बाळासाहेब प्रभाकर बहिरट हे नाव नेहमीच पुणे शहर पोलिस दलात धाडस, शिस्त आणि कर्तव्यपरायणतेचे प्रतीक म्हणून स्मरणात राहील. त्यांच्या कार्याने अनेक गुन्हेगार गुडघे टेकले, अनेक गुन्हे उघडकीस आले आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने पुणे शहरातील नागरिक, पोलिस दलाचे अधिकारी व सहकारी यांच्याकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
पुढील आयुष्य सुख, शांतता व आरोग्याने भरभरून जावो!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!