
नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे परिसरात आढळलेल्या युवतीच्या खुनाचा छडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला आहे. युवतीचा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपी आणि मृत युवती दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
नाशिकमधील वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारूळच्या जंगलात एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी कोणतेही स्पष्ट धागेदोरे नसतानाही पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या खुनाचा उलगडा केला. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चावी आणि त्याला लावलेले की-चेन आढळले. त्या की-चेनवर ‘संस्कृती’ असे नाव लिहिलेले होते. या छोट्याशा धाग्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. राज्यात ‘संस्कृती’ नावाची कोणती मुलगी बेपत्ता आहे का, याची माहिती गोळा करण्यात आली. तपासादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील येथील संस्कृती सतीश काळे ही मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.

पोलिसांना तपास पुढे नेताना संस्कृतीच्या ओळखीतील देशमुख कुटुंबातील अथर्व देशमुख याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्याचा शोध घेतला असता तो सिन्नर, कोपरगाव आणि नाशिक शहर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नाशिक शहर पोलिसांच्या मदतीने अथर्व देशमुख आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत अथर्वने अखेर खुनाची कबुली दिली.
अथर्वने चौकशीत सांगितले की, संस्कृती आणि त्याचे प्रेम संबंध होते. मात्र तिला दुसऱ्या मुलासोबत पाहिल्याने त्याला राग अनावर झाला. त्यातूनच त्याने खुनाचा कट रचला. अथर्व नाशिकमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो, तर संस्कृती अकोला जिल्ह्यात शिक्षण घेत होती. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने अथर्व बुलढाण्यात घरी गेला होता. त्याने मित्रासोबत फिरायला जाण्याचे कारण सांगत संस्कृतीला कारमध्ये बसवले. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच त्याने गाडीतच तिच्यावर चाकूने वार करून खून केला. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे सुचत नसल्याने आरोपीने नाशिककडे धाव घेतली. त्याने मृतदेह वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात टाकून दिला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भगवान मथुरे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. अत्यंत बारकाईने तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत खुनाचा उलगडा केला आणि आरोपीला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिक! 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट…
नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…
नाशिक! रिसॉर्टवर हळदीच्या दिवशीच वधूचा मृत्यू अन् तिथेच आठवडापूर्वी…
नाशिकमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना गंडा…

