
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला अटक; मृत्यूपूर्वीच्या कॉलवरुन वाढला संभ्रम…
मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे यांच्या दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे गौरी पालवे यांना समजले होते. त्यामुळे अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांच्यात भांडणे व्हायची. याच वादातून गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गौरी पालवे यांचे पती अनंत गर्जे, दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल गर्जे या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वरळी पोलिसांनी रविवारी रात्री 1 वाजता अनंत गर्जे याला अटक करण्यात आली आहे.
अनंत गर्जे याने रविवारी रात्री 1 वाजता गर्जे यांनी वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. वरळी पोलिसांनी गौरी पालवे गर्जे आत्महत्येप्रकरणी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अनंत गर्जे याच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पत्नीच्या दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर दिनांक 24 रोजी मध्यरात्री वरळी पोलिस स्थानकात हजर झालो. कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य रितीने पार पडावी, यासाठी स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनसमोर यावे, यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला तयार आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. गौरी पालवे यांच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. गौरीने गळफास लावून घेतल्यानंतर अनंत गर्जे यांनी तिचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला. त्यावेळीच पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक का केली नाही. त्यावेळी त्यांना सोडून का देण्यात आले, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.
गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. गौरी हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय गौरीच्या माहेरच्या मंडळींनी बोलून दाखवला. गौरीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवरुन माझ्याशी संपर्क साधला होता. मी आत्महत्या करत असल्याचे तिने मला सांगितले. त्यावेळी मी पंकजा मुंडे यांच्यासोबत दौऱ्यावर होतो. गौरीचा फोन आल्यानंतर मी तातडीने दौरा रद्द करुन घरी परतलो. तोपर्यंत गौरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मी घरी गेलो तेव्हा तिने दरवाजा उघडला नाही. मी 31व्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून 30 व्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटच्या खिडकीत उतरलो. तेव्हा खिडकीतून मला गौरीचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला. यानंतर आम्ही गौरीला तातडीने नायर रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असा दावा अनंत गर्जे यांनी केला होता.
अनंत गर्जे आणि गौरी पालवे- गर्जे हे दोघे गेल्या महिन्यातच वरळीत भाड्याने राहण्यास आले होते. गौरी पालवे-गर्जे यांचा दीर अजय हादेखील त्यांच्यासोबत राहायचा. शुक्रवारी रात्री अनंत गर्जे यांनी त्यांच्या सासऱ्यांना फोन केला होता. याबाबत माहिती देताना गौरी पालवे-गर्जे यांच्या वडिलांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता अनंतचे दोन मिस कॉल वडिलांना आले होते. त्यांनी पुन्हा कॉल केल्यावर अनंतने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर गौरीकडे चौकशी केली असता तिने सर्व ठीक असल्याचे सांगितले. परंतु, शनिवारी संध्याकाळी पावणेसात वाजता अनंतने वडिलांना पुन्हा कॉल करुन, ‘गौरी सुसाइड करतेय तिला समजवा’, असे म्हटले. वडिलांनी गौरीकडे फोन द्यायला सांगताच अनंत गर्जे यांनी तिला दवाखान्यात घेऊन जातोय, असे सांगून फोन कट केला. त्यानंतर रात्री आठ वाजता नायर रुग्णालयात गौरी पालवे-गर्जे यांना मृत घोषित करण्यात आले.
या सगळ्या प्रकारानंतर गौरी पालवे यांच्या माहेरच्या कुटुंबाने अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौरीला अनंत गर्जे यांच्या अनैतिक संबंधांबाबत माहिती होते. अनंत गर्जे आणि त्याचे कुटुंबीय गौरीला टॉर्चर करायचे. अनंतने फोन कॉलवर गौरी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. मग त्याने गौरीला गळफास घेण्यापासून थांबवले का नाही?, असा सवाल गौरीच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला. याप्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

