हृदयद्रावक! मुलीने बेडरूमधील दृष्य पाहून फोडला हंबरडा…
नागपूर : प्रेमविवाह केलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. सोनिया मंडले (वय 38) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर राजेश मंडले (वय 45 वर्षे, मॉयल कॉलनी, छावणी) असे आरोपी पतीचे नाव आहे.
आरोपी राजेश मंडले हा बेरोजगार असल्यामुळे त्याची पहिली पत्नी दोन मुलांसह वेगळी राहात होती. यानंतर राजेश याने सोनियाशी प्रेमविवाह केला. दोघांना 13 वर्षांची मुलगी आहे. सोनिया मोईल या कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मात्र, यादरम्यान राजेशला कर्करोग झाल्याचे समोर आले. मागच्या तीन वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्यावर उपचार करत होती. मात्र, दिवसेंदिवस हा आजार वाढत होता. त्यामुळे चिडचिड निर्माण होऊन त्याचे सतत पत्नीबरोबर भांडण होत होते.
दोघांमध्ये वाद झाला आणि राजेशने पत्नी सोनियाच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची हत्या केली. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्याची तेरा वर्षांची मुलगी उठली आणि तिने आईला हाक मारली. यावेळी काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे ती बेडरूममध्ये गेली. यावेळी तिला तिचे वडील लटकलेले आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर तिने मोठ्याने हंबरडा फोडला. मुलीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर पर्वते आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. या घटनेमुळे मॉईल कॉलनीत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.