Live Video सुरु असतानाच झाडल्या गोळ्या; इन्फ्लूएंसरचा जागीच मृत्यू…

मेक्सिको: ब्यूटी सलूनमधून टिकटॉक लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू असताना गोळ्या झाडण्यात आल्यामुळे इन्फ्लूएंसरचा जागीच मृत्यू झाला आहे. १४ मे २०२५ रोजी ही घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या जलिस्को प्रांतातील झापोपन येथे ही घटना घडली आहे. व्हालेरिया मार्केज (वय २३) सलूनमध्ये टिकटॉकवर लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती. यावेळी एक व्यक्ती भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने सलूनमध्ये घुसली. त्याने व्हालेरियाची ओळख विचारली आणि लगेच तिच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोर नंतर मोटरसायकलवरून फरार झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्सना धक्का बसला आहे. हा हल्ला सुनियोजित होता. घटना घडल्यानंतर झापोपन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आहे. तथापि, अद्याप हल्ल्यामागील नेमकं कारण आणि हल्लेखोराची ओळख स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, मेक्सिकोमध्ये महिलांवरील हिंसाचार हा गंभीर मुद्दा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, मेक्सिकोमध्ये दररोज सुमारे १० महिला किंवा मुलींची हत्या केली जाते. व्हालेरियाच्या हत्येने या समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त केला, तर काहींनी देशातील असुरक्षिततेवर संताप व्यक्त केला.

व्हालेरिया मार्केज ब्यूटी आणि लाइफस्टाइल व्हिडिओंसाठी टिकटॉकवर प्रसिद्ध होती. तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात होती. तिने आपल्या सलूनमधून नियमितपणे लाइव्ह स्ट्रीमिंग करत प्रेक्षकांशी संवाद साधला. तिच्या अकाली निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!