
पोलिस उपनिरीक्षकाने खाकी वर्दीतच धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी…
हिंगोली : हिंगोली पोलिस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारत जगाचा निरोप घेतला आहे. अमोल गंगलवाड (वय 50) असे मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. खाकी वर्दीमध्येच पोलिस अधिकाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हिंगोली पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोली शहरातील खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे रुळावर आज (शनिवार) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पूर्णा येथून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रेनची अमोल गंगलवाड वाट पाहत उभे होते. रेल्वे जवळ येताच त्यांनी अचानक धावत्या ट्रेनसमोर उडी घेतली. या घटनेत गंभीर दुखापत झाल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
View this post on Instagram
दरम्यान, या घटनेची माहिती रेल्वेच्या लोको पायलटने तात्काळ हिंगोली रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. त्यानंतर शहर पोलिसांना याविषयी कळवण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंगोलीचे पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अमोल गंगलवाड यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे.
अमोल गंगलवाड यांची दोन महिन्यांपूर्वीच परभणी पोलिस दलातून हिंगोली पोलिस दलात बदली झाली होती. अत्यंत मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती. घटनेच्या ठिकाणी पोलिसांना कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही, त्यामुळे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..
पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना…
बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या…
पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…
मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…

