डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये ‘जनआक्रोश आंदोलन’ ‘एसआयटी’ चौकशीची मागणी…

कराड: फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी गेल्या २७ ऑगस्टला सायन येथे आत्महत्या केली. या घटनेने संतप्त झालेले गावकरी व फलटण परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर ‘जनआक्रोश आंदोलन’ केले. यावेळी पुणे विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीना मदने, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सचिव प्रसाद कोंडे-देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचे स्वीय सचिव दत्तात्रय मोहिते, कुमार परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करा, अशी संतप्त मागणी डॉ. रुपनवर यांचे नातेवाईक व गावकऱ्यांनी केली.

नातेपुते, माळशिरस, सदाशिवनगर परिसरातील हजारो नागरिक भर उन्हात फलटणच्या बारामती चौकतील शासकीय उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मांडून होते. यावेळी जमलेल्या गावकऱ्यांनी डॉ. रुपनवर यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, तसेच वरील दोषींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा मागण्या गावकऱ्यांनी केल्या. उपजिल्हा रुग्णालयाला रात्रीपासूनच पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

‘जन आक्रोश आंदोलना’तील डॉक्टरांच्या नातेवाईकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सचिव दत्तात्रय मोहिते हे धमकी व धक्काबुक्की झाली, त्याप्रसंगी हजर होते. त्यामुळे त्यांनाही आरोपी करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे या घटनेमुळे फलटणमध्ये खळबळ उडाली आहे.

आंदोलनामुळे फलटण उपजिल्हा रुग्णालय बंद करण्यात आले होते. मात्र, अतिदक्षता विभाग चालू होता. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात डॉ. रुपनवर यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा फलक लावला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!