
भारतीय महिलेच्या खूनाची माहिती देणाऱ्याला ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून बक्षीसाच्या रकमेत वाढ…
सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये 2015 साली आयटीमध्ये काम करणाऱ्या भारतीय महिलेची हत्या झाली होती. भररस्त्यात एका अज्ञात मारेकऱ्यानं महिलेला भोसकले होते. पोलिसांनी हत्येबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या बक्षीसाच्या रकमेत वाढ करुन ते एक मिलियन डॉलर म्हणजे सुमारे आठ कोटी रुपये केली आहे.
बंगळुरूमधील प्रभा अरुण कुमार (वय ४१) या विवाहित महिलेचा ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये खून झाला होता. आयटी कंपनीत काम करणारी प्रभा सात मार्च 2015 रोजी रात्री 9.30 वाजता रस्त्यावरून घराकडे निघाली होती. ती भारतात असलेल्या नवऱ्याशी फोनवरून बोलत होती. यावेळी हेल्लेखोराने तिला भोसकले होते. नवऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या विव्हळण्याचा आणि मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा आवाज त्याने फोनवरून ऐकला होता. तुला हवं तर सगळ्या मौल्यवान वस्तू घे; पण मला मारू नकोस अशी गयावया ही प्रभाने केल्याचे ऐकले होते. मात्र हल्लेखोरानं तिला मारले.
प्रभा आयटीमध्ये काम करत होती. नवरा आणि नातेवाईकांपासून लांब असल्याचा तिला त्रास होत होता. त्यामुळेच ती भारतात परतण्याविषयी विचार करत होती. पण, तिचा खून झाला होता. ही घटना घडून इतकी वर्षं होऊनही मारेकऱ्याला शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घटनेचा तपास करण्याकरता ऑस्ट्रेलियन पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले. तसंच नागरिकांनाही माहिती देण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात आले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
दरम्यान, प्रभा यांची हत्या झाली तेव्हा तिच्या नवऱ्याला एक मैत्रिण असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे या हत्येमध्ये त्याचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. मात्र त्याच्याबरोबरच आणखीही अनेकांची चौकशी करण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पण, प्रभा यांच्या नवऱ्यानं मात्र हत्याप्रकरणात हात असल्याचे सगळे आरोप फेटाळले आहेत.
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी हत्येची माहिती देणाऱ्याला एक मिलियन डॉलर (आठ कोटी रुपयांहून अधिक) रक्कम बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रभा यांचे अनेक नातेवाईक भारतात राहत असल्यामुळे ही बक्षिसाची रक्कम भारतीयांनाही मिळू शकते, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जमिनीत गाडले जिवंत; अन् पुढे…
पोलिस झाले हायटेक! आरोपींच्या शरीरावर बसवले जीपीएस; पळाला तरी…

