
माझगावमध्ये गणपती आगमनावेळी दोन गटांत तणाव, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
मुंबईः मुंबईतील माझगाव परिसरात काल ‘माझगावचा मोरया’ गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यादरम्यान, अंडी फेकण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गणेश मंडळाचे कार्यकर्ते, तरुण आणि गणेशभक्तांनी रात्री आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. सदर घटनेमुळे मध्यरात्री ३ वाजेपर्यंत माझगावमध्ये दोन गटांत तणाव निर्माण झाला होता.
गणेश मंडळ आणि भक्तांकडून कॉन्टिनेन्टल हाइट्स या इमारतीतून अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, अंडी नेमकी कोणी आणि कुठून फेकण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून चालू आहे. या तपासानंतरच या घटनेमागचं नेमकं सत्य समोर येईल. दरम्यान, पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अंडी फेकल्याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही.
या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. घटनास्थळाच्या परिसरात तीन ते चार मोठ्या इमारती आहेत. नेमक्या कोणत्या इमारतीमधून अंडी फेकण्यात आली, याचा शोध चालू आहे. गणेश मंडळ आणि भक्तांकडून एका इमारतीवर संशय व्यक्त करण्यात येत असला, तरी पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
सध्या पोलिसांच्या डिटेक्शन टीमकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. डिटेक्शन टीमकडून परिसरातील इमारतींमध्ये जाऊन चौकशी केली जात असून, सीसीटीव्ही फुटेजसह इतर बाबींचीही तपासणी केली जात आहे. पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.
यंदा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होईल. मुंबईत सुमारे १०,६०० सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यापैकी केवळ २,५०० मंडळांनी १० दिवसांच्या उत्सवासाठी परवानगी घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २८ लाख गणेश मूर्तींची स्थापना होण्याचा अंदाज आहे. मुंबईत मंडळाच्या परवानगीसाठी ऑनलाइन सिंगल-विंडो प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बीएमसीसोबत स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिसांची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देखील ऑनलाइन मिळू शकेल. अर्ज १३ सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे.

