
पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत अधिकृत आधारकार्ड केंद्र असल्याचे भासवून नागरीकांसह शासनाची फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात दहशतवाद विरोधी शाखेला यश आले आहे.
पिंपरी चिंचवड येथील अधिकाऱ्यांना भोसरी पो.स्टे. हद्दीतील गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने भोसरी पो.स्टे. हद्दीत पुणे नाशिक हायवे लगत कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या दुकानामध्ये महा ई सेवा केंद्र आहे. सदर ठिकाणी केंद्र चालक शिवराज चांभारे हा बनावट कागदपत्रांचे सहायाने आधारकार्ड मध्ये फेरबदल करुन देतो अशी बातमी मिळाली होती. सदरबाबत पोलिस आयुक्त यांना कळविले असता त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. जिल्हाधिकारी, पुणे यांना आधारकार्डमध्ये बेकायदेशीरपणे फेरबदल करुन आधार कायदा २०१६ मधील तरतुदींचा भंग करुन शासनाची दिशाभुल केली जात असल्याने संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करणेसाठी त्यांचे अधिनस्त आधार नियंत्रण समितीतील संबंधीत टीमला हजर ठेवणेबाबत विनंती केली.
०६/१२/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, पुणे यांचे कार्यालयाकडील श्री. जाधव, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक तसेच श्री. खोत, जिल्हा समन्वयक हे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर झाले होते. त्यांना बातमीचा आशय समजावुन सांगुन कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितले. त्यानुसार द. वि.शा. कडील स्टाफ त्यांचेसह आधार सनियंत्रण समिती सदस्य असे भोसरी पो.स्टे. येथे जाऊन भोसरी पो.स्टे. कडील पो.उप.नि. श्री. केंद्रे व स्टाफ तसेच शासकीय पंचांसह बातमीचे आशयाप्रमाणे कारवाई करणे कामी रवाना झाले. त्यानंतर कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या दुकानामध्ये जाऊन सदर ठिकाणी हजर असणारे व्यक्ती व महिला यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) शिवराज प्रकाश चांभारे (कांबळे), वय ४० वर्ष, रा.धावडेवस्ती भोसरी, २) स्वाती शिवराज चांभारे (स्वाती. एल. काबंळे), वय ३६ वर्ष असे असल्याची सांगितले.
आधार सनियंत्रण समिती सदस्य श्री. जाधव यांनी त्यांना त्यांचेकडे आधारकार्ड बनविण्याचा अधिकृत परवाना आहे काय? असे विचारले असता त्यांनी अधिकृत परवाना नसल्याचे सांगितले. यास्तव पो.उप.नि. केंद्रे व सपोनि राऊत व इतर टीम सदस्य यांनी सदर कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी दुकानाची पाहणी केली असता त्याठिकाणी शिवराज चांभारे यांना त्यांचे कामामध्ये मदत करण्यासाठी त्यांचा नातेवाईक धोंडीबा शेवाळकर (वय २४ वर्ष, रा. सदर), व दुसरा कामगार गणेश यंगड (वय २३ वर्ष, रा. मोशी, पुणे) हे कामास हजर असल्याचे आढळून आले. त्यांनतर सदर ठिकाणी तपासणी केली असता ०६ / १२ / २०२३ रोजीच्या तसेच त्यापुर्वीच्या नागरिकांच्या आधार नोंदणी केलेल्या अनेक पावत्या (एन्रोलमेंट स्लीप) मिळाल्या व सदर पावत्यांवरील एन्रोलमेंट एजन्सी कोड व स्टेशन आयडी कोड आधार सनियंत्रण समिती सदस्य यांनी तपासुन पाहिले असता त्यापैकी काही पावत्यांवर एन्रोलमेंट एजन्सी कोड ०५१६ व स्टेशन आयडी कोड १५३३४ असल्याचे आढळून आले.
सदरचे कोड हे गर्व्हमेंट ऑफ राजस्थान व एन्रोलमेंट एजन्सी राज कॉम्प इन्फो सर्व्हसेस लि. यांचेकडील असल्याचे आढळून आले. तसेच इतर आधार पावत्या चेक केल्या असता एन्रोलमेंट एजन्सी कोड ०८६३ व स्टेशन आयडी कोड ५२०१४ असल्याचे आढळुन आले. सदरचे एन्रोलमेंट एजन्सी कोड हे स्कुल एज्युकेशन डिपार्टमेंट राजस्थान यांचे नावे असल्याचे आढळुन आले. त्याशिवाय इतर काही आधार पावत्या चेक केल्या असता त्यामध्ये एन्रोलमेंट एजन्सी कोड ०६९१ व स्टेशन आयडी कोड ९००१० असल्याचे आढळुन आले. सदरचे एन्रोलमेंट एजन्सी कोड हे इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक राजस्थान यांचे नावे असल्याचे आढळून आले. त्यावेळी आधार सनियंत्रण समिती सदस्य श्री. जाधव यांनी शिवाराज चांभारे यास त्याचेवर यापुर्वी सुध्दा कारवाई झाली होती ना असे विचारले असता त्याने सांगितले की, साधारणत: एक ते दीड वर्षापुर्वी त्याचा आधारसंच जप्त करण्यात आला होता व त्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे विनंती अर्ज करुन व माफीनामा देवुन सदर संच परत प्राप्त करून घेतला होता. यावरुन शिवराज चांभारे हा मागील दोन ते तीन वर्षापासुन याप्रकारे आधारकार्ड मध्ये अनाधिकृत पणे बदल करत असल्याचे दिसुन आले.
सर्व टीमने कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या दुकानाची सखोल तपासणी केली असता सदर ठिकाणी बनावट लाईटबीलच्या प्रती, काही इसमांचे ओरिजनल आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, तसेच विविध राज्यांचे जन्मदाखल्यांच्या प्रती, वेगवेगळे अनधिकृत रबरी शिक्के ( त्यामध्ये पिंपरी चिंचवड म.न.पा. कडील नगरसेवक, नोटरी, सिक्युरिटी एजन्सी व फिंगर प्रिंट च्या ठश्यांचे शिक्के), बायोमॅट्रीक आधार संच लॉग इन करण्यासाठी आवश्यक असणारे आयरीस चे वेगवेगळ्या अँगल मधून कागदावर प्रिंट केलेले फोटो, नोटरी संजय वाहणे यांचे नोटरी करण्याचे साहित्य व सही केलेले व शिक्का असलेले हिरव्या रंगाचे लिगल साईजचे कोरे कागद, नाव बदल केलेले राजपत्र इत्यादी साहित्य व इतर अनेक कागदपत्रे व रजिस्टर, आधारकार्ड कार्ड नोंदणी करणे कामी लागणारे साहित्य (लॅपटॉप, आयरीस स्कॅनर, फिंगर प्रिन्ट स्कॅनर, कॅमेरा, जीपीएस इ.) मिळुन आल्याने ते पो.उप.नि. श्री केंद्रे यांनी जप्त केले.
याप्रकारे आरोपी नामे १ ) शिवराज चांभारे ( कांबळे) व २)स्वाती चांभारे (स्वाती. एल. काबंळे) यांनी ३) धोंडीबा शेवाळकर, ४) गणेश यंगड यांचे मदतीने कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी, पुणे नाशिक हायवे लगत भोसरी येथे मागील सुमारे दोन ते तीन वर्षापासुन ते दि. ०६/१२/२०२३ रोजी पर्यंत स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता तो व त्याची पत्नी हे आधारकार्ड मध्ये बदल करण्यास अधिकृत व्यक्ती नसल्याचे स्वतःस माहीत असताना सुध्दा लोंकाना ते अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र चालक असल्याचे भासवून लोकांची बनावट कागदपत्रे तयार करुन आधारकार्ड मध्ये तसेच इतर शासकीय कागपत्रांमध्ये त्यांचे कामगारांचे मदतीने अनधिकृतपणे बदल करुन शासनाची फसवणुक करत असल्याचे आढळून आल्याने द. वि. शा. कडील श्रेणी पो.उप.नि. एस. एन. गायकवाड यांनी वरील आरोपींविरुध्द दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी पो.स्टे. गु.र.नं. ९८३ / २०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७३, ३४ व आधार कायदा २०१६ चे कलम ३६ व ४२ अन्वये दि. ०६/१२/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे गांभिर्य पाहता त्याचा पुढील तपास शिवाजी गवारे, व.पो.नि., भोसरी पो.स्टे. हे स्वतः करीत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त, विशेष शाखा, डॉ. शिवाजी पवार व सहा. पोलिस आयुक्त, विशेष शाखा, श्री. सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा, पिंपरी चिंचवड येथील अधिकारी व अंमलदार तसेच भोसरी पो.स्टे. कडील व.पो.नि., श्री. शिवाजी गवारे, पो.उप.नि. श्री.अशोक केंद्रे, म.पो. ना सुषमा पाटील, म.पो. ना. प्रतिभा मुळे, पो. शि. सचिन जाधव, पो.शि. आशिष गोपी, पो. शि. स्वामी नरवडे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक…
पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; ३ पिस्टल जप्त…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…
पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

