
तामिळनाडूमध्ये १०० कोटी रुपये किमतीचे १३७ किलो मेथाम्फेटामाइन ‘डीआरआय’च्या छाप्यात जप्त…
नवी दिल्ली: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तामिळनाडूच्या नागपट्टिनम जिल्ह्यातील एका किनारपट्टीवरील गावातून सुमारे १०० कोटी रुपये किमतीचे १३७ किलो क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन हे प्रतिबंधित कृत्रिम अंमली पदार्थ जप्त केले आहे.
अलिकडच्या वर्षांतील किनारपट्टी प्रदेशातील सर्वात मोठ्या अंमली पदार्थ जप्तींपैकी एक असलेल्या या छाप्यात, ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी १६ आणि १७ ऑक्टोबर दरम्यान एक पाळत आणि अंमलबजावणी मोहीम राबवली. श्रीलंकेत अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित किनारपट्टीवरील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला.
हा माल समुद्री मार्गाने श्रीलंकेत तस्करी करून नेण्याचा उद्देश होता. अवैध अंमली पदार्थांच्या बाजारपेठेतील जप्त केलेल्या या प्रतिबंधित मालाचे मूल्य १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज असल्याचे, अर्थ मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
नागपट्टिनम जिल्ह्यातील एका किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा करून तो श्रीलंकेला पुढे तस्करी करण्यासाठी नेण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
झडतीत सहा डफल बॅगा सापडल्या असून, त्यात प्रत्येकी सुमारे ५ किलो वजनाची २७ सिल्व्हर-फॉइलची पाकिटे होती. या पाकिटांमध्ये एक पांढरा स्फटिकासारखा पदार्थ होता, जो उच्च शुद्धतेचे मेथाम्फेटामाइन असल्याचा संशय होता.
संशयिताच्या निवासस्थानी एकाच वेळी केलेल्या झडतीत, ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी विक्रीतून मिळालेल्या रकमेतून असल्याचे मानले जाणारे १० लाख रुपये रोख जप्त केले. अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन चारचाकी आणि एक दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली. ‘एनडीपीएस कायदा, १९८५’ च्या तरतुदींनुसार चार जणांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असे मंत्रालयाने सांगितले.

